अवैध चराई करणाऱ्यांची सहायक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:10+5:302021-09-21T04:15:10+5:30
मोर्शी : तालुक्यातील चिंचोली गवळी येथील बेलखेडा रोपवन वाटिकेत अवैधरीत्या जनावरांची चराई करणाऱ्यांनीच सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी व ...

अवैध चराई करणाऱ्यांची सहायक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न
मोर्शी : तालुक्यातील चिंचोली गवळी येथील बेलखेडा रोपवन वाटिकेत अवैधरीत्या जनावरांची चराई करणाऱ्यांनीच सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मोर्शी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, चिंचोली गवळी येथील बेलखेडा शिवारात वनविभागाची रोपवन वाटिका आहे. या रोपवन वाटिकेत काही दिवसांपासून चिंचोली गवळी येथील अंदाजे ५० ते ५५ म्हशींची अवैधरीत्या वनविभागाच्या जंगलात चराई होत असल्याचे उदखेड परिमंडळाचे सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश बलोदे व अन्य कर्मचाऱ्यांना जंगल गस्तीदरम्यान आढळून आले. त्यांनी ही माहिती मोर्शी येथील वनपरिक्षेत्र अधिकरी प्रशांत भुजाडे यांना दिली. लगेच त्यांनी रोपवन वाटिकेत प्रवेश करून अन्य कर्मऱ्यांच्या मदतीने चराई करीत असलेल्या ५० ते ५५ म्हशी, गाय व वासरू एकत्रित करून खानापूर येथील कोंडवाड्यात कोंडण्याकरिता चिंचोली गवळी ते चिखलसावंगी रस्त्याने घेऊन येत असताना त्याची कुणकुण चिंचोली गवळी येथील म्हैसपालकांना लागली. यामुळे अविनाश गंजीवाले, रामेश्वर गंजीवाले, योगेश कावल, सुरेश आप्पा वाले, आणि संदीप मनोहर खलबू यांच्यासह २० ते २५ म्हैशी पालक एकत्रित येऊन त्यांनी सहायक वनपरिक्षेत्राधिकारी जगदीश बलोदे, वनरक्षक आर.आर. हिवराळे व नितीन लंगडे, हंगामी वनमजूर जितेश राऊत, पुंडलिक मुळे यांना अडवून त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जगदीश बलोदे यांनी मोर्शी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली. मात्र, खानापूर बीटचे अंमलदार काळे यांनी मोर्शी पोलिसांत एनसी तक्रार नोंदवून अवैधरीत्या म्हैशी चारणाऱ्या चार जणांविरुद्ध कलम १८६, ४२७, ५०४ अन्वये गुन्गा नोंदविला. तथापि, घटनेत सहभागी संदीप खलबू याच्याविरुद्ध गुन्हा नोंद नोंदविला नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू आहे.