अंजनगावात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: July 9, 2015 00:08 IST2015-07-09T00:08:52+5:302015-07-09T00:08:52+5:30
स्थानिक आठवडी बाजार परिसरातील गोकुळडुसा जिन येथील सिमेंट-लोखंडाच्या व्यापाऱ्यावर त्याच्या घरात शिरून प्राणघातक हल्ला करण्यात आला.

अंजनगावात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला
पाच बुरखाधारी सीसीटीव्हीत कैद : संशयित युवतीला अटक
अंजनगाव सुर्जी : स्थानिक आठवडी बाजार परिसरातील गोकुळडुसा जिन येथील सिमेंट-लोखंडाच्या व्यापाऱ्यावर त्याच्या घरात शिरून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात व्यापारी गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. घटनेच्या वेळी लढ्ढा यांच्या घरात उपस्थित असलेल्या एका तरूणीला पोलिसांनी परतवाड्याहून ताब्यात घेतले आहे. या तरूणीची कसून चौकशी सुरू आहे.
विस्तृत माहितीनुसार कोकर्डा येथील मूळ रहिवासी दीपक लढ्ढा हे स्थानिक आठवडी बाजार परिसरातील गोकुळडुसा जीन येथून सिमेंट-लोखंडाचा व्यापार करतात. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या आरोपींनी लढ्ढा यांना मारहाण करून जखमी केल्याची ही घटना प्रथमदर्शनी दरोड्याचा प्रकार वाटत असली तरी घटनेच्यावेळी लढ्ढा यांच्या घरात युवतीचे उपस्थित असणे आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या आरोपींच्या एकूणच हालचालींवरून हा पूर्वनियोजित घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तरुणीचे विसंगत
बयाण संशयास्पद
लढ्ढा यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चेहरा झाकलेल्या दोन आरोपींसह इतर तीन आरोपींच्या हालचाली दिसून आल्या.लवकरच आरोपींपर्यंत पोहोचण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. तरूणीचे बयाण विसंगत असून संशयास्पद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दीपक लढ्ढा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या आतडीला खोलवर जखमा झाल्याने त्यांची प्रकृती ४८ तासापर्यंत चिंताजनक आहे.
- डॉ. कौस्तुभ सारडा