संत्रा झाडावर ‘कोलत्या’ रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 00:03 IST2016-07-31T00:03:06+5:302016-07-31T00:03:06+5:30

दिवसागणिक नवीन समस्यांच्या विळख्यात सापडणाऱ्या बळीराजावर पुन्हा नवीन संकट कोसळले आहे.

Attack of 'Kolati' disease on Orange tree | संत्रा झाडावर ‘कोलत्या’ रोगाचे आक्रमण

संत्रा झाडावर ‘कोलत्या’ रोगाचे आक्रमण

कोट्यवधींचे नुकसान : झाडांचे शेंडे वाळले, शेतकरी हवालदिल
नरेंद्र जावरे  परतवाडा
दिवसागणिक नवीन समस्यांच्या विळख्यात सापडणाऱ्या बळीराजावर पुन्हा नवीन संकट कोसळले आहे. तालुक्यातील हजारो संत्राझाडावर कोलत्या (शेंडे मर, पायकूज व मुळकूज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहे. परिणामी शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली. शासनाने प्रथमच या रोगावर उपाययोजना करण्याची मागणी केली.
अचलपूर तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी अधिक आहेत. धोतरखेडा, एकलासपूर, मल्हारा, गौरखेडा, हनवतखेडा, वडगाव, दर्याबाद, रासेगाव, चमक, कविठा, देऊरवाडा परिसरात संत्रा उत्पादन घेण्यात येते. यावर्षी प्रथमच संत्रा झाडावरील शेंडे अचानक वाळू लागल्याने हिरव्या फांद्यांसह आंबिया बहराची संत्री वाळून जमिनीवर गळत आहेत. ‘कोलत्या’ रोगाचे निदान लागल्यावर शास्त्रीय भाषेत शेंडेमर, पायकूज, मुळकूज रोग असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या व्यवहारात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षी एक कोटी रुपयांचा ‘सेस’ प्राप्त झाला होता. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक मदार आंबिया बहरावर असताना यावर्षी बहरलेल्या झाडांवर कोलत्या रोगाच्या आक्रमणाने बळीराजा हवालदिल झाला आहे.संत्राची झाडे पिवळी पडलेली आहेत व काही झाडे सुकत आहेत. झाडावरील संत्रा फळे पिवळे पडून गळत आहे. झाडाची मुळे सडलेल्या आढळून आल्या. रोगग्रस्त मुळांचा जाळवा व माती प्रयोगशाळेत फायटोप्थोरा बुरशीच्या निदानाकरिता घेण्यात आली.

नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ प्रक्रिया केंद्राची चमू दाखल
संत्रा झाडांचे शेंडे वाळू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आशिष सातव यांना दिली होती. त्यांनी नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ प्रक्रिया केंद्राशी संपर्क साधून स्थिती सांगितली होती. त्यानुसार शनिवारी नागपूरहून आलेल्या चमूने दर्याबाद, हनवतखेडा आदी परिसरातील संत्रा बागांना भेटी देवून पाहणी केली व शेतकऱ्यांना काही सूचना दिल्या. या चमूमध्ये जी. एम. बोरकर, डी. ओ. गर्ग आणि अशोककुमार यांचा समावेश होता.

Web Title: Attack of 'Kolati' disease on Orange tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.