‘फातिमा’च्या शिक्षकाविरूध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: January 14, 2015 23:01 IST2015-01-14T23:01:16+5:302015-01-14T23:01:16+5:30
क्षुल्लक कारणावरुन आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या व त्याच्या आईला धक्काबुक्की जातीवाचक शिवीगाळ करणारा फातिमा कॉन्व्हेंटचा शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर पंधरा दिवसांनंतर

‘फातिमा’च्या शिक्षकाविरूध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
तपास सुरू : विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे प्रकरण
अचलपूर : क्षुल्लक कारणावरुन आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या व त्याच्या आईला धक्काबुक्की जातीवाचक शिवीगाळ करणारा फातिमा कॉन्व्हेंटचा शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर पंधरा दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासात दोषी आढळल्यास सदर व्यक्तींना अटक करण्यात येणार आहे.
याप्रकरणी काही आदिवासी संघटनाही न्याय मिळवून देण्यासाठी सरसावल्या होत्या. याप्रकरणी विद्यार्थी व त्याच्या आईने परतवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तेथे शिक्षक व कर्मचारी दोघांच्या बाजू ऐकून पोलिसांनी हे प्रकरण तपासात ठेवले होते. पोलीस नायक असलेल्या आईने आयुक्त, गृहमंत्री आदी वरिष्ठांना तक्रार अर्ज दिल्यानंतर परतवाडा पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फातिमा कॉन्व्हेंटचा इयत्ता १० वीचा विद्यार्थी कृणाल महादेवराव कास्देकर याला २३ डिसेंबर रोजी शिक्षकाने मारले होते. याचा जाब विचारायला गेलेल्या आईलासुद्धा अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
याची तक्रार सरमसपुरा ठाण्यात पोलीस नायक असलेल्या आई सुमेरी महादेव कास्देकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविली. 'मी अचलपूर येथील सरमसपुरा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना मला फोन आला की, तुमच्या मुलाला शिक्षक आशिष सुरदे हे मारहाण करीत आहे. मी शाळेत गेली असता काही मुले व शिक्षिका कृणालचे सांत्वन करीत होते. याप्रकरणाची विचारपूस केली असता तेथील सिस्टर, शिक्षकांनी माझ्याशी हुज्जत घातली. धक्काबुक्की करीत जातीवाचक शिवीगाळ केली. सुरदे यांनी मला नग्न करुन धिंड काढण्याची धमकी देऊन माझ्या गालावर थापड लगावली. मी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. मात्र साहेबांनी तुम्ही येथेच थांबा त्यांना पकडून आणतो, असे सांगून दोन तास ताटकळत ठेवले. माझ्या पतींनीही एफआयआर दाखल करण्याची विनंती केली. परंतु टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर माझा मुलगा कृणाल याचा तक्रारी अर्ज घेतला. त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. परंतु माझ्यावर झालेल्या अन्यायाची साधी चौकशीही करण्यात आली नाही. मला योग्य न्याय द्यावा, असे तक्रार अर्जात नमूद केले आहे. या अर्जावरुन अखेर शाळेचे शिक्षक आशिष सुरदे व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)