लग्नाचे नाटक रचून युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 00:16 IST2016-10-30T00:16:56+5:302016-10-30T00:16:56+5:30
लग्नाचे खोटे नाटक रचून सीआरपीएफ जवानाने एका महाविद्यालयीन युवतीचे शारीरिक शोषण केले व नंतर तिला घरी सोडून ...

लग्नाचे नाटक रचून युवतीवर अत्याचार
पीडित युवती : तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार
अमरावती : लग्नाचे खोटे नाटक रचून सीआरपीएफ जवानाने एका महाविद्यालयीन युवतीचे शारीरिक शोषण केले व नंतर तिला घरी सोडून कायमचे पलायन केल्याची तक्रार युवतीने केली आहे. प्रथम तिच्या तक्रारीकडे पोलिसांनी कानाडोळा केला. मात्र प्रहार व रिपाइंने हस्तक्षेप केल्यामुळे शुक्रवारी खोलापुरी गेट पोलिसांनी तक्रार घेत न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.
तिवसा तालुक्यातील हसनापूर बोर्डा येथील नीलेश गोविंदराव वानखडे हा सध्या सीआरपीएफमध्ये कार्यरत असून सन २०१२ पासून पीडित युवतीला तो ओळखतो. दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे अनेकदा त्याने पीडित युवतीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. परंतु युवतीने त्याकडे कानाडोळा केला.
सप्टेंबर २०१६ मध्ये तो काही दिवसांच्या सुटीवर हसनापूर बोर्डा येथे आला असता १४ सप्टेंबर रोजी त्याने सदर युवतीला फूस लावून अमरावती येथे आणले आणि तिला विश्वासात घेऊन अंबादेवी मंदिरात हार घालून लग्न केले. त्यानंतर बुधवारा येथे भाड्याने खोली घेऊन १४ ते २१ सप्टेंबर पर्यंत तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तिला हसनापूर येथील घरी घेऊन गेला. मात्र मुलगी दलित असल्याचे समजताच तिला जातीवाचक शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले.
नीलेश वानखडे याने पीडिताला तिच्या घरी सोडले व दोन दिवसांत परत घ्यायला येतो म्हणून सांगितले. मात्र तो अद्यापही परतला नसल्याने मुलीने कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु कुऱ्हा पोलिसांनी त्यांना हाकलून लावले. तक्रार दिल्याचे नीलेशच्या नातेवाईकांना कळताच सर्वांनी पीडिताच्या कुटुंबावर बहिष्कार घातला. कुऱ्हा पोलिसांनी कोणतीच मदत केली नाही. उलट खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. येथेही तीच समस्या निर्माण झाली होती. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची कोणीच दखल घेत नसल्याने अखेर पीडिताने जिल्हा परिषद सदस्य विनोद डांगे यांच्याशी संपर्क करून रिपाइं व प्रहारच्या माध्यमातून शुक्रवारी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले असून नीलेश वानखडे व त्यांच्या कुटुंबियांवर अॅट्रॉसिटी व अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी जि.प. सदस्य विनोद डांगे प्रहारचे जोगेंद्र मोहोड, गजानन मोहोड, रिपाइंचे अमोल इंगळे यांनी केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी चौकशी आरंभली असून तक्रारकर्त्या महिलेच्या पतीला बोलावून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पुढील दिशा ठरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)
पोलीस बेदखल, पीडित कुटुंब दहशतीखाली
पीडित युवती व तिच्या कुटुंबीयांवर गावकऱ्यांनी अघोषित बहिष्कार टाकला असून वारंवार जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात येत आहे. कुऱ्हा पोलिसांनी याबाबत काहीच दखल घेतली नसून संपूर्ण कुटुंबीय दहशतीखाली जगत असल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली आहे.
पती-पत्नीच्या वादाची तक्रार प्राप्त झाली आहे. पुढील चौकशी करून कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.
- अनिल कुरुळकर,
ठाणेदार, खोलापुरी गेट ठाणे.