‘एटीसी’ नियुक्तीची फाईल सचिवांकडे
By Admin | Updated: April 27, 2016 00:01 IST2016-04-27T00:01:52+5:302016-04-27T00:01:52+5:30
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तपदी अधिकारी (एटीसी) नियुक्तीची फाईल सचिवांचा दालनात असून दोन ते तीन दिवसांत ही फाईल ओके होईल, ...

‘एटीसी’ नियुक्तीची फाईल सचिवांकडे
आठ महिन्यांपासून प्रतीक्षा : मेघमाळे यांची वर्णी लागण्याचे संकेत
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तपदी अधिकारी (एटीसी) नियुक्तीची फाईल सचिवांचा दालनात असून दोन ते तीन दिवसांत ही फाईल ओके होईल, असे संकेत आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांची ‘एटीसी’पदी नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे आठ महिन्यांपासून ‘एटीसी’ कोण? ही प्रतीक्षा संपण्याचे चिन्हे आहेत.
आदिवासी विकास विभागाने महेशकुमार मेघमाळे यांनी २२ मार्च रोजी अमरावती ‘एटीसी’ पदी प्रतिनियुक्ती केली होती. मेघमाळे हे ४ एप्रिल रोजी पदाची सूत्रेदेखील सांभाळणार होते. मात्र अचानक कोठून सुत्रे हलली हे कळले नाही. २९ मार्च रोजी पुन्हा आदिवासी विकास विभागाने नवा आदेश काढून अपर आयुक्तपदी मेघमाळे यांच्या प्रतिनियुक्तीला स्थगनादेश दिला होता. आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त कार्यालयातंर्गत सात प्रकल्प कार्यालये आणि १२ जिल्ह्यांमध्ये नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ५०० कोटींपेक्षा अधिक बजेट ‘एटीसी’ कार्यालयाचे आहे. मात्र गत आठ महिन्यांपासून नवीन ‘एटीसी’पदी अधिकारी नियुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे योजनांचा बोजवारा उडाला आहे. हल्ली नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त माधवी खोडे यांच्याकडे अमरावतीचा प्रभार सोपविण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांनी अमरावतीत ‘एटीसी’पदी कर्तव्यनिष्ठ अधिकारी नियुक्तीला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आदिवासी विकास मंत्रालयात सचिवांकडे सदर फाईल पाठविण्यात आली आहे. आठ महिन्यांपासूनच्या प्रतीेक्षेला याच आठवड्यात ‘एटीसी’पदी अधिकारी नियुक्ती करून शासन ‘बॅकलॉग’ भरणार असल्याचे चित्र आहे.