वडुरा शेतशिवारात अस्वलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:14 IST2017-01-25T00:14:51+5:302017-01-25T00:14:51+5:30

शहरालगतच्या वडुरा शेत शिवारातील एक गव्हाच्या शेतात जिवंत विद्युत तारेचा प्रवाह सोडून अस्वलाला ठार मारण्यात आल्याचा प्रकार ...

Assu's murder in Vadura farmland | वडुरा शेतशिवारात अस्वलाची हत्या

वडुरा शेतशिवारात अस्वलाची हत्या

आरोपी अज्ञात : चारही पंजे बेपत्ता, शेतात सोडला विद्युत प्रवाह
नरेंद्र जावरे परतवाडा
शहरालगतच्या वडुरा शेत शिवारातील एक गव्हाच्या शेतात जिवंत विद्युत तारेचा प्रवाह सोडून अस्वलाला ठार मारण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी १० वाजता उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
परतवाडा वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडुरा गाव शेतशिवारात काटकर नामक पटवारी यांचे चार एकर शेत आहे. त्यांनी सदर शेत बन्सी गोंठू राजने (५०, रा.पांढरी) यांना लागवणीने दिले आहे. या चार एकर शेतामध्ये २ एकर परिसरात गव्हाचे पीक असून उर्वरित पडीक ठेवण्यात आले आहे. त्या पडीक जमिनीत विहीर असून पाणी ओलितासाठी आवश्यक असणारा विद्युत प्रवाह अवैधरीत्या घेण्यात आलेला आहे.
रविवारी २२ जानेवारी रोजी बन्सी राजने यांनी २ एकर शेततील गव्हाला सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत ओलिताचे पाणी दिले आणि नंतर पांढरी येथे त्यांच्या घरी ते निघून गेले, अशी माहिती मंगळवार २४ जानेवारी रोजी शेतमालक काटकर यांनी उपरोक्त घटनेसंदर्भात दिल्याचे बयाण वनकर्मचाऱ्यांनी नोंदविले आहे.
चारही पंजे गायब
मृत अस्वलाचे दोन्ही पाय व हाताचे पंजे घटनास्थळावरून बेपत्ता आढळून आले आहे. अस्वलास जिवंत विद्युत तारेने ठार मारल्यावरसुद्धा लाकडी चरपटाने मारून पूर्णपण जीव गेल्याची खात्री अज्ञात शिकाऱ्यांनी केल्याचा अंदाज घटनास्थळी निदर्शनास आले होते. अमरावती वनविभागाचे सहायक वनसंरक्षक आर.जी. बोंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे, वनपाल बी.आर. झामरे सह आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत अस्वलीला विद्युत तारेचा स्पर्श होताच तडफडत किमान २० ते २५ फूट अंतरापर्यंत तो जीवाच्या आकांताने तडफडत गेल्याचे चित्र स्पष्ट होत होते.
अवैध विद्युत प्रवाहाने हत्या
काटकर यांच्या शेतात विहिरीसाठी परिवहन महामंडळाकडून अधिकृतरीत्या विद्युत प्रवाह घेण्यात आला नसून विद्युत मंडळाच्या पोलवरील लाईनवरून आकोडे टाकून प्रवाह ओलितासाठी घेण्यात आल्याचे चित्र होते. शिकाऱ्यांनी अस्वलाला ठार मारण्यासाठी जिवंत विद्युत प्रवाहसुद्धा त्याच पद्धतीने घेतला. शेतात राणटी डुकरांकडून पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी अशाप्रकारे ग्रामीण भागात जिवघेणा प्रकार केला जातो, हे विशेष. याच आकोडा पद्धतीवरून महामंडळाचे कर्मचारी व शेतमालकामध्ये मोठा आर्थिक व्यवहार चालतो, अशी चर्चा आहे.

अस्वलास अग्नी दिला
वडुरा शेत शिवारात मृतावस्थेत आढळून आलेल्या अस्वलाचे घटनास्थळी २ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शिवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर तेथेच अग्निसंस्कार करण्याची तयारी वृत्त लिहिस्तोेवर सुरु होती. तसेच अस्वलाचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट होणार आहे.

वडुरा शेतशिवारात अस्वल मृत आढळून आले. कश्याने मृत्यू झाला व आरोपी कोण याचा शोध घेतला जाईल. शेतात अवैधरीत्या विद्युत प्रवाह आढळून आला आहे. जिवंत विद्युत तारेने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
- आर. जी. बोंडे, सहा वनसंरक्षक,
अमरावती वनविभाग

Web Title: Assu's murder in Vadura farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.