सहायक निबंधक कार्यालय बिनभाड्याच्या इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST2021-06-11T04:09:34+5:302021-06-11T04:09:34+5:30
फोटो पी १० अचलपूर बाजार समिती परतवाडा : अचलपूरचे सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय बिनभाड्याच्या इमारतीत मागील सहा ...

सहायक निबंधक कार्यालय बिनभाड्याच्या इमारतीत
फोटो पी १० अचलपूर बाजार समिती
परतवाडा : अचलपूरचे सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय बिनभाड्याच्या इमारतीत मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. याकरिता अचलपूर बाजार समितीच्या टीएमसी यार्डवरील शेतकरीहिताच्या इमारतीवर कब्जा करण्यात आला आहे. या इमारतीच्या भाड्यापोटी मागील सहा वर्षांत एक रुपयाही बाजार समितीला देण्यात आलेला नाही.
अचलपूर बाजार समितीसोबत कुठलाही करार न करता तत्कालीन सहायक निबंधकांनी सहा वर्षांपूर्वी या इमारतीत अतिक्रमण केले. आजही ते कायम आहे. या अतिक्रमणाकडे आणि इमारतीच्या भाड्यापोटी होणाऱ्या अपेक्षित उत्पन्नाकडे अचलपूर बाजार समितीचे दुर्लक्ष केले आहे. यात बाजार समितीचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
अचलपूर बाजार समितीवर प्रशासक म्हणून जबाबदारी असताना तत्कालीन सहायक निबंधकांनी २०१५ मध्ये स्व-अधिकारात हे कार्यालय बाजार समितीच्या आवारात आणले. तेव्हापासून हे कार्यालय याच आवारातील त्याच इमारतीत आहे. हे कार्यालय बाजार समितीच्या आवारात आणताना त्यांनी बाजार समितीसोबत कुठलाच करारनामा केला नाही आणि फुकटात ही इमारत ताब्यात घेतली. या इमारतीचे भाडेही निश्चित करण्यात आलेले नाही.
दरम्यान, सहायक निबंधकांच्या कार्यालयीन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ पासून २०२१ पर्यंत सतत बाजार समितीच्या सचिवांकडे कराराबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या शासकीय इमारतीचे भाडे निश्चित करून तसे सुचविण्याबाबतही बाजार समितीला वेळोवेळी कळविण्यात आल्याचे कार्यालयीन सूत्रांनी स्पष्ट केले.पण, बाजार समितीच्या प्रशासकीय यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष केले गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांनी भाडे निश्चित करून घेतले नाही. सहायक निबंधकांसमवेत कुठलाही भाडे करार बाजार समितीच्या प्रशासकीय यंत्रणेने मागील सहा वर्षात एकदाही केला नाही.
प्रत्यक्षात याच इमारतीच्या पहिल्या भागात कृषी विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयासोबत बाजार समितीने करारनामा केला आहे. वर्षाला लाख रुपये भाड्यापोटी बाजार समितीला कृषी विभागाकडून मिळतात. असे असतानाही सहायक निबंधक कार्यालयाला ही सूट बाजार समितीकडून कशाकरिता, यावर मात्र उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोट
२०१५ पासून करारनामा नाही. करारनामा नसल्याने बाजार समितीला भाडे दिले गेले नाही. करारनाम्यानंतर भाडे बाजार समितीकडे वळते केले जाईल.
- अच्युत उल्हे, सहायक निबंधक, सहकारी संस्था
अचलपूर
दि 09/06/21 इमारतीचा फोटो