सहायक आयुक्तांचे ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन
By Admin | Updated: September 30, 2015 00:24 IST2015-09-30T00:24:08+5:302015-09-30T00:24:08+5:30
भाजीबाजार झोन क्रमांक ५ च्या सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांचे मंगळवारी ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन करण्यात आले.

सहायक आयुक्तांचे ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन
महापालिका आयुक्तांचा निर्णय : कामात कुचराई करणे भोवले
अमरावती : भाजीबाजार झोन क्रमांक ५ च्या सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांचे मंगळवारी ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन करण्यात आले. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे सकाळी झोन कार्यालयात दौऱ्यावर गेले असता त्यांनी जागेवरच निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती आहे.
आयुक्त गुडेवारांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भाजीबाजार येथील झोन कार्यालय गाठले. ते कार्यालयात पोहोचताच अधिकारी, कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यानंतर आयुक्तांनी सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांचा वर्ग घेण्यास प्रारंभ केला. मालमत्ताकराची वसुली, शासन अनुदानातील शौचालय निर्मिती, प्रभागनिहाय स्वच्छतेचा लेखाजोखा तपासला तेव्हा आयुक्त गुडेवार यांचा पारा चढला. सहायक आयुक्त पदावर काम करताना नियम, कायद्याचे ज्ञान आहे की नाही, अशी विचारणा त्यांनी सहायक आयुक्त मकेश्वर यांना केली. यावेळी मकेश्वरांनी आयुक्त गुडेवारांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिले नाही. याउलट आयुक्त गुडेवार यांच्याशी सुषमा मकेश्वर यांनी शाब्दिक वाद घातला. त्यामुळे आयुक्त गुडेवार आणखीच चिडले. त्यानंतर आयुक्तांनी नगरसचिव मदन तांबेकर यांच्याशी संवाद साधून सुषमा मकेश्वर यांच्या निलंबनाचे आदेश काढण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तांच्या आदेशान्वये महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७३ चे नियम ३(१),(२),(३) चे उल्लघंन करणारी बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटकलम (१) अ अन्वये महाराष्ट्र महापालिका अधिनियम (५६) २ नुसार सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाचे आदेश हे मकेश्वर यांना देण्यात आले असून निलंबन काळातील मुख्यालय महापालिका सामान्य प्रशासन विभाग हे ठेवण्यात आले आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुषमा मकेश्वर ‘नॉट रिचेबल’
सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांच्या निलंबनानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत. त्यांचा मोबाईल सतत ‘नॉट रिचेबल’ होता. ‘आॅन दी स्पॉट’ निलंबनामुळे अन्य अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. मकेश्वर यांचा प्रभार वरिष्ठ लिपिक प्रवीण इंगोले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मकेश्वर शासनाच्या द्वितीय श्रेणीच्या अधिकारी
सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर या शासनाच्या वर्ग-२ च्या अधिकारी आहेत. त्यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली कशी? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वर्ग-२ अधिकाऱ्यांची बदली, वेतनवाढ, स्थानांतरण यासर्व प्रक्रिया शासनस्तरावरून चालतात. तरीदेखील आयुक्तांनी कोणत्या अधिकारात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, हा गुंता कायम आहे.
झोनमध्ये स्वच्छता व्यवस्था कुचकामी होती, तर शौचालय बांधकाम निर्मितीतही काहीच सुधारणा नव्हती. वारंवार सूचना, आदेश देऊनही काहीच बदल झाला नाही. अखेर माझ्या अधिकाराचा वापर करून ही कारवाई केली.
- चंद्रकांत गुडेवार,
आयुक्त, महापालिका.