बेदम मारहाण शिक्षकाला अटक
By Admin | Updated: October 2, 2015 02:21 IST2015-10-02T02:21:23+5:302015-10-02T02:21:23+5:30
तालुक्यातील नांदुरी जिल्हा परिषद शाळेत पायाभूत चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरे लिहिल्याने संतापलेल्या

बेदम मारहाण शिक्षकाला अटक
धारणी : तालुक्यातील नांदुरी जिल्हा परिषद शाळेत पायाभूत चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरे लिहिल्याने संतापलेल्या वर्गशिक्षकाने नऊ आदिवासी विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारहाण केली. ही संतापजनक घटना बुधवारी घडली. शिक्षकाला गुरुवारी अटक करण्यात आली. नीलेश पटोरकर असे आरोपीचे नाव आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याकरिता सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील नांदुरी येथील जि.प. शाळेत ३० सप्टेंबर रोजी पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत शाळेतील आदित्य चिमोटे, सागर कास्देकर, दुर्गेश मावस्कर, उर्मिला बेलखेडे, रेणुका पटोरकर, खुशी चिमोटे, मोनिका कास्देकर या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेत योग्य उत्तरे लिहिता आली नाहीत. ही बाब वर्गशिक्षक नीलेश पटोरकर यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांचा संताप झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना याबाबत जाब विचारला. मात्र, चुकीची उत्तरे लिहिण्याचे कारण विद्यार्थ्यांना सांगता आले नाही. विद्यार्थी अनुत्तरीत झाल्याने या शिक्षकाचा संताप अधिकच अनावर झाला आणि त्याने आदिवासी विद्यार्थ्यांना पाठीवर वळ उमटेपर्यंत निघेपर्यंत बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.
ही घटना पालकांना कळताच त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन धारणी पोलीस ठाणे गाठले आणि उशिरा रात्री पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर धारणी पोलीस ठाण्याचे दुय्यम फौजदार सुधाकर चव्हाण यांनी तत्काळ आरोपी शिक्षकास अटक केली. शिक्षकावर कारवाई केल्यानंतरच संतप्त पालकांचा रोष कमी झाला. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटनेची सर्वत्र चर्चा होती.
पायाभूत चाचण्यांमधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता उघडकीस येणार आहे. त्यामुळे सर्व काही ‘आॅलवेल’ दाखविण्याकरिता शिक्षकांची धडपड सुरू असते. त्यात या आदिवासी विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरे लिहिल्याने शिक्षकाचा संताप झाला असावा, अशी चर्चा आहे.
(तालुका / शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना बेदम मारहाण प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
- सुधाकर चव्हाण,
दुय्यम फौजदार, धारणी.