शिक्षकांच्या थकीत वेतनाप्रकरणी बीडीओंना विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:12 IST2021-03-21T04:12:51+5:302021-03-21T04:12:51+5:30
धारणी : येथील पंचायत समितीसमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांकडून विचारणा करण्यात आली व खुलासा ...

शिक्षकांच्या थकीत वेतनाप्रकरणी बीडीओंना विचारणा
धारणी : येथील पंचायत समितीसमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांकडून विचारणा करण्यात आली व खुलासा मागविण्यात आला.
धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांना जानेवारी २०२१ पासून अद्याप वेतन न मिळाल्याने १६ मार्चला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धारणी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. पंचायत समिती सभापतींसह गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत चर्चेअंती धारणी पंचायत समितीकडून शिक्षकांचे वेतन अदा करण्यात दिरंगाई होत असल्याचे समोर आले. १७ मार्चला सर्व शिक्षकांच्या वेतनाचा धनादेश देण्याचे आश्वासन देऊन आंदोलन संपविण्यात पंचायत समितीला यश आले. मात्र, प्रसार माध्यमांतून हा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी धारणीचे गटविकास अधिकारी महेश पाटील व गटशिक्षणाधिकारी बंडू पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन तात्काळ कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले. परिणामी, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना उशिरा वेतन देण्याचा खुलासा १९ मार्चपर्यत लेखी स्वरूपात सादर करण्याचे पत्र बीडीओ व बीईओंना दिले.
------