आश्रमशाळा असुरक्षित

By Admin | Updated: July 19, 2016 23:56 IST2016-07-19T23:56:43+5:302016-07-19T23:56:43+5:30

आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळांची परिस्थिती विदारकच आहे.

Ashramshalas are unsafe | आश्रमशाळा असुरक्षित

आश्रमशाळा असुरक्षित

राजकीय हस्तक्षेप : स्वच्छतेचे तीनतेरा, अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
अमरावती : आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळांची परिस्थिती विदारकच आहे. या सर्व आश्रमशाळांवर राजकीय पुढाऱ्यांची मक्तेदारी आहे. भोजन कंत्राटापासून तर विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करेपर्यत राजकीय हस्तक्षेपामुळे निकृष्ट दर्जा हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाचवीला पुजला आहे. संरक्षण भिंतींचा अभाव, कालबाह्य इमारती, वर्षानुवर्षांपासून इमारतींची रखडलेली डागडुजी, स्वच्छतेचे तिनतेरा, जंगलाशेजारी असलेल्या इमारती, कधी मुख्याध्यापक गायब तर कधी शिक्षकांचा पत्ता नाही, अशा स्थितीत आश्रमशाळा चालविल्या जातात. जिल्ह्यात एकुण ३३ आश्रमशाळा आहेत. शासनाकडून आश्रमशाळांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी आदिवासी व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना फारशा सुविधा मिळत नाहीत. अनुदानित आश्रमशाळा या अपहाराचे कुरण बनल्या आहेत. जिल्ह्यात एक, दोन आश्रमशाळा वगळता अन्य आश्रमशाळांना संरक्षण भिंत नसल्याचे वास्तव आहे. आश्रमशाळांवर राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्यांना सतत अभय मिळत असल्याची माहिती आहे. बऱ्याच आश्रमशाळांना संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थी असुरक्षिततेच्या सावटात शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये मूलभूत आणि पायाभूत सुविधांची वानवा ही नित्याचीच बाब आहे. (प्रतिनिधी)

समाजकल्याणच्या १३ आश्रमशाळा
समाजकल्याण विभागाच्या जिल्ह्यात १३ आश्रमशाळा आहेत. यापैकी बहुतांश आश्रमशाळा या राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत. अनुदान लाटण्यासाठी जणू आश्रमशाळा सुरु असल्याचे चित्र आहे. अचलपूर, मोर्शी, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार तर अमरावतीनजिकच्या बहिलोलपूर येथे आश्रमशाळा सुरु आहे. या सर्व आश्रमशाळा खासगी संस्थेमार्फत चालविल्या जातात. संरक्षण भिंती नसल्याची अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची ओरड आहे.

आदिवासी विकास विभागाच्या २० आश्रमशाळा
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करुन शिक्षण घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्याभरात आहे. यापूर्वी २७ आश्रमशाळा सुरु होत्या. मात्र सात आश्रमशाळा बंद करण्यात आल्यात. तूर्तास आदिवासी मुला- मुलीसांठी २० आश्रमशाळा चालविल्या जातात. दुर्गम भाग तसेच जंगलाशेजारी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात. धारणी, चिखलदरा तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक आश्रमशाळा आहेत. अमरावती शहरात कठोरा परिसरात आश्रमशाळा सुरु आहे. चांदुररेल्वे, बिरोटी येथे सुद्धा आश्रमशाळा चालविल्या जातात.

Web Title: Ashramshalas are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.