आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना नरकयातना
By Admin | Updated: December 21, 2014 22:49 IST2014-12-21T22:49:27+5:302014-12-21T22:49:27+5:30
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळव्दारा संचालित श्री. रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळेत असुविधांनी कळस गाठला असून येथील विद्यार्थी नरकयातना भोगत आहेत. गत आठवडाभरापासून शिवराम

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना नरकयातना
हव्याप्र मंडळाच्या वसतिगृहात अनागोंदी : आदिवासी विकास विभागाकडे पालकांची तक्रार
अमरावती : येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळव्दारा संचालित श्री. रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळेत असुविधांनी कळस गाठला असून येथील विद्यार्थी नरकयातना भोगत आहेत. गत आठवडाभरापासून शिवराम श्रावण धुर्वे नामक विद्यार्थ्याला गंभीर त्वचारोगाने ग्रासले असून याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी आदिवासी विकास विभागाकडे दिली आहे. शरीरावरील डाग आणि खाजेने तो त्रस्त झाला आहे.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे क्रीडा प्रशिक्षणासाठी जगप्रसिद्ध आहे. मंडळात क्रीडा उपक्रमांसह अभियांत्रिकी महाविद्यालय, आश्रमशाळा, शाळा, महाविद्यालये चालविली जातात. नामांकित संस्था म्हणून नावारुपास आलेल्या हव्याप्रमंडळाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळू नयेत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेला अनुदान मिळत असताना आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्याच सुविधा पुरविली जात नसतील तर हा प्रकार संस्थेच्या नावलौकिकास धक्का पोहोचविणारा आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत ठिकठिकाणी घाण, केरकचरा पसरल्याची तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. येथील शौचालयात दगड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंबानाल्यावर शौचास जावे लागते. आश्रमशाळेतील वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना मारहाण करतात. आश्रमशाळेत एक ना अनेक समस्या उद्भवल्या असताना संस्थाचालकांचे अजिबात लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, फराळ मिळणे अपेक्षित आहे; तथापि रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळेत शनिवार, रविवार वगळता इतर दिवशी एकच वेळ जेवण मिळत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दुपारचे जेवण मिळत नसल्याने भूक लागल्यास मेसमध्ये जाऊन खाद्यपदार्थांची चोरी करीत असल्याची कबुली देत शिवराम धुर्वे या विद्यार्थ्याने सत्य विषद केले.
शिवराम धुर्वे या
विद्यार्थ्याच्या शरीरावर डाग
आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या शिवराम धुर्वे नामक विद्यार्थ्याचा शरीरावर चर्मरोगामुळे डाग निर्माण झाले आहे. त्याच्या गुप्तांगावरही मोठ्या प्रमाणात जखमा असून त्याला खाजेचा आजारही झाला आहे. थातुरमातूर औषधोपचारानंतरही हे डाग दरदिवसाला वाढतच आहेत.चर्मरोगाने ग्रासल्याने अन्य विद्यार्थी जवळ करीत नाही, असेदेखील त्याने सांगितले. चार वर्गखोल्यांचा कारभार आश्रमशाळेत चालविला जात असल्याची माहिती आहे. विद्यार्थीसंख्या अधिक असल्याने झोपायला जागा नसते, असे शिवराम म्हणाला.