हतरूच्या सरपंच, उपसरपंचाची खेळी; ‘हार’ दिसताच ‘प्रहार’मध्ये प्रवेश?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 15:32 IST2022-01-25T15:29:01+5:302022-01-25T15:32:38+5:30
ग्रामपंचायत हतरूमध्ये सहा गावांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच कालू बेठेकर आणि उपसरपंच मुन्ना बेठेकर यांच्याविरुद्ध ९ सदस्यांनी अतिशय गंभीर आरोप करीत तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला.

हतरूच्या सरपंच, उपसरपंचाची खेळी; ‘हार’ दिसताच ‘प्रहार’मध्ये प्रवेश?
अमरावती : हिंदीत एक म्हण आहे 'मरता क्या न करता?' राजकारणात तिचा सर्वाधिक वापर होतो. मेळघाटच्या हतरू येथील सरपंच व उपसरपंच यांनी तोच प्रयोग सोमवारी केला. तब्बल नऊ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचे पत्र दाखल केले. त्याबाबत निर्णय ग्रामसभेत २७ जानेवारी तारखेला होईल. परंतु, पराभव दिसू लागताच प्रहारमध्ये प्रवेश केल्याची एकच चर्चा तालुक्यात रंगली आहे.
अतिदुर्गम व तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत हतरूमध्ये सहा गावांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच कालू बेठेकर आणि उपसरपंच मुन्ना बेठेकर यांच्याविरुद्ध नऊ सदस्यांनी अतिशय गंभीर आरोप करीत तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला. २७ जानेवारी रोजी त्यावर ग्रामसभेत निर्णय घेणार आहे. सरपंच, उपसरपंचांची खुर्ची हलल्याने हालचालींना वेग आला आहे. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच सदस्यांची मुस्कटदाबी करीत असल्याने पायउतार वजा घरी जाण्याची वेळ त्यांच्यावर येऊ घातली आहे. गांगरखेडा, मेहरीआम येथील कित्ता हतरू येथे गिरवला जाणार का, अशी विचारणा होत आहे.
सदस्यांची पळवापळवी?
चिखलदरा तहसील कार्यालयात सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल होताच सीताराम अखंडे, बाबूलाल बेठेकर, भैयालाल मावस्कर, बापूराव कासदेकर, अनिता सेलूकर, पिनू मावस्कर, सारिका काकडे, प्यारी बेठेकर, भुरय भुसुम असे सर्व सदस्य गावातून बेपत्ता आहेत. सरपंच, उपसरपंच यांनी शोध घेऊन त्यांना आर्थिक आमिषही दाखविले. परंतु, त्यांच्यापुढे नन्नाचा पाढा संतप्त सदस्यांनी वाचला.
राजाश्रय वाचविणार का?
सरपंच, उपसरपंचांनी सोमवारी प्रहार संघटनेत पडती बाजू पाहता प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, विधानसभेत त्यांचा कौल भाजप उमेदवाराच्या बाजूने होता. ग्रामपंचायतीमध्ये केलेला कारनामा पाहता आदिवासी प्रचंड विरोधात आहेत. त्यामुळे सदस्यांच्या ओढाताणीत राजकीय राजाश्रय त्यांना वाचविणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. सर्वांच्या नजरा त्याकडे खिळलेल्या आहेत.