जीवनावश्यक वस्तूंची आवक थांबणार

By Admin | Updated: October 5, 2015 00:24 IST2015-10-05T00:24:35+5:302015-10-05T00:24:35+5:30

टोल टॅक्स पूर्णपणे बंद करण्याची मागणी घेऊन चार दिवसांपासून वाहतूकदारसंघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे.

The arrivals of essential commodities will be stopped | जीवनावश्यक वस्तूंची आवक थांबणार

जीवनावश्यक वस्तूंची आवक थांबणार

ट्रकची चाके थांबली : वाहतूकदारांचा संप सुरूच, जनजीवन प्रभावित
अमरावती : टोल टॅक्स पूर्णपणे बंद करण्याची मागणी घेऊन चार दिवसांपासून वाहतूकदारसंघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६० ते ७० कोटींचे व्यवहार ठप्प झाले असून मोठे नुकसान होत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे ट्रान्सपोर्ट चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून सोमवारपासून आंदोलन आणखी तीव्र करण्याचे संकेत अमरावती ट्रान्सपोर्ट एजन्ट असोसिएशनचे अध्यक्ष इम्रान खान दाऊद खान यांनी दिले आहे. अमरावती जिल्ह्यात छोटे-मोठे माल वाहतूक करणारे जवळपास ९ हजार ट्रक असून बहुतांश ट्रकचालकांनी या संपात सहभाग घेतला आहे. मागील चार दिवसांपासून संप सुरू असल्यामुळे जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या मालाची आवक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा परिणाम नागरिकांवर होत आहे.
भाजीपाल्याची आवकही थांबणार
अमरावती : विविध राज्यातील माल ट्रकने अमरावती जिल्ह्यात येतो. मात्र, ट्रकची चाके थांबल्यामुळे सर्व व्यावसायिकांच्या मालाची आवक बंद झाली आहे. सोमवारपासून भाजीपाला व फळांची मालवाहतूक करणारे संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची आवकही बंद होणार असल्याचे दिसते. खासगी ट्रॅव्हल्ससह जीवनावश्यक वस्तुंची मालवाहतूक करणारे संपात सहभागी होणार असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आतापर्यंत वाहतुकदारांनी गांधीगिरी आंदोलन करून शासनाला साकडे घातले होते. मात्र, आता आंदोलन उग्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. अमरावती ट्रान्सपोर्ट एजन्ट असोसिएशनशी आतापर्यंत १३ संघटना जुळल्या असून सर्व मालवाहतूकदार संपात सहभागी झाले आहेत. टोलटॅक्स बंद करण्याबाबत दिल्ली येथील आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट क्राँगे्रस व मुंबई येथील महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, बस, टॅन्कर महासंघ यांनी शासनासोबत चर्चा केली आहे. मात्र, शासन उदासीन असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
विविध टोलनाक्यांवरील उत्पन्नापैकी शासनाला १४१५७ कोटी वार्षिक मिळकत होते. परंतु हे टोलनाके बंद करून फक्त नॅशनल परमीटधारकांकडूनच शासनाला ही रक्कम एकरकमी देण्याची तयारी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची आहे. मात्र, यासाठी शासन तयार नाही. अर्थातच यात कुठे तरी पाणी मुरत आहे, असा आरोपही ट्रान्सपोर्ट एजन्ट असोसिएशनचे अध्यक्ष इम्रान खान दाऊद खान यांनी केला. या बेमुदत संपाला शासनाने प्रतिसाद न दिल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला आहे. पेट्रोल-डिझेल टॅन्कर असोसिएशनची बैठक नागपूर येथे होणार असून ते सुध्दा संपात सहभागी होण्याचे संकेत आहेत.
अमरावतीमधील आंदोलनात इमरान खान, जकीउल्ला, विलास लिखितकर, मिराज खान, विजय यादव, विजय शर्मा, जिया अहमद, पवन आकोलकर, राजेन्द्र डेहनकर, अमिन बेग, सलिम खान, अब्दुल जमीर, अब्दुल सलीम, अबरार अहमद, गोपाल तिवारी, शाकिर अहमद, करीम लालुवाले, इमरान पठाण, अहमद पटेल, संदीप साहू, एजाज पटेल, रफीक खान, मुश्ताक अहमद, कैलाश गुप्ता, निर्मल अहेरवाल आदींचा सहभाग आहे.

Web Title: The arrivals of essential commodities will be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.