संत्रा महोत्सवाच्या जागृतीसाठी कृषिरथ रवाना
By Admin | Updated: September 25, 2015 01:04 IST2015-09-25T01:04:59+5:302015-09-25T01:04:59+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, शेतकऱ्यांना उत्पादन आणि बाजारपेठेबद्दल माहिती मिळावी...

संत्रा महोत्सवाच्या जागृतीसाठी कृषिरथ रवाना
वरूड : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, शेतकऱ्यांना उत्पादन आणि बाजारपेठेबद्दल माहिती मिळावी याकरीता १ ते ४ आॅक्टोबर पर्यंत राज्यस्तरीय कृषि व संत्रा महोत्सवाचे आयोजन स्थानिक बाजार समितीच्या परिसरात करण्यात आले आहे. शा महोत्सवाची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचवावी म्हणून कृषि विभागाच्या वतीने कृषीरथ तयार करण्यात आला. या कृषीरथाला आ.अनिल बोंडे यांनी बुधवारी हिरवी झेंडी दाखविली.
राज्यस्तरीय कृषी व संत्रा महोत्सवाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. याकरिता प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, केंद्रीयमंत्री ना. हसंराज अहिर, कृषी राज्यमंत्री ना. एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे उपस्थित राहतील. कृषीरथाला हिरवी झेंडी दाखविण्याकरिता आ.अनिल बोंडे, नगराध्यक्ष रविंद्र थोरात, तहसीलदार पुरुषोत्तम भुुसारी उपस्थित होते. वरुडच्या संत्र्याला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने हा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विदर्भामध्ये १ लाख ३८ हजार हेक्टर जमिनीवर संत्रा पीक घेतले जाते. यातील ६० टक्के क्षेत्रफळ अमरावती जिल्हयात आहे. एकटया वरुड-मोर्शी तालुक्यात ४८ हजार हेक्टर जमिनीवर संत्रापीक आहे. जातो. या महोत्सवामुळे परिसरातील संत्रा, कापूस , सोयाबिन उत्पादकांना उभारी मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.