मोर्शीकडे येणारा शस्त्रसाठा जप्त, तीन आरोपींना अटक
By Admin | Updated: February 18, 2015 00:02 IST2015-02-18T00:02:46+5:302015-02-18T00:02:46+5:30
जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोर्शीकडे येणारा घातक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मोर्शीकडे येणारा शस्त्रसाठा जप्त, तीन आरोपींना अटक
मोर्शी : जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोर्शीकडे येणारा घातक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, या घटनेतील आरोपींमध्ये आॅटोरिक्षा चालक सैजाद खान मुजप्फर खान, जुगलसिंग बादलसिंग बावरी, बालसिंग सोनसिंग बावरी, (तिघेही रा तळेगाव शामजीपंत) यांचा समावेश आहे. येथून ८ किमी अंतरावर असलेल्या सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. या महोत्सवानिमित्त जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मोठया प्रमाणात सतर्कता बाळगली जाते. जिल्हा पोलिस वाहतूक शाखासुद्धा तपासात तैनात आहे. सोमवारी वाहतूक शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन, पोलिसांनी मोर्शीकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम सुरु केली होती. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास सिंभोरा मार्गावर अश्याच रितीने तपासणी सुरु असताना मोर्शी वाहतूक शाखेचे अरुण साबळे यांनी आॅटो एम.एच. ३२ बी ८६६४ ला अडवून त्याची तपासणी केली. आॅटोरिक्षात एका प्लास्टिकच्या गोणपाटात एकूण पाच तलवारी आणि १० गुप्त्या आढळून आल्यात. हा शस्त्रसाठा आॅटोरिक्षासह जप्त करण्यात आला. शिवाय आॅटो चालक सैजाद खान (३५), जुगलसिंग बालसिंग बावरी, बालसिंग सोनूसिंग बावरी तिघेही तळेगाव शामजी पंत यांना आर्म्स अॅक्टच्या कलम ४/२५ आणि मुंबई पोलिस कायद्याच्या कलम १३५ प्रमाणे अटक करण्यात आली. यात्रा कालावधी शिवाय मोर्शीला या पूर्वी घडलेल्या काही घटनांच्या अनुषंगाने संबंधित आरोपी एवढा मोठा शस्त्रसाठा कोठे आणि कशासाठी नेत होते किंवा कोणाला विकणार होते या बाबीच्या तपासाकरीता आरोपींची पोलिस कोठडी घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक अविनाश इंगळे हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)