लाचखोर एपीआयसह शिपायाला अटक
By Admin | Updated: June 9, 2017 00:18 IST2017-06-09T00:18:12+5:302017-06-09T00:18:12+5:30
राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीला अभय देण्यासाठी लाचेची मागणी

लाचखोर एपीआयसह शिपायाला अटक
पाच हजारांची मागितली लाच : राजापेठ ठाण्यातील कर्मचारी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीला अभय देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह त्याच्या राईटरसह पोलीस शिपायाला गुरूवारी अटक करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणीअंती ही कारवाई केली.
विकास विश्वनाथ अडागळे असे अटक करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे तर प्रवीण शंकर ढोबळे असे पोलीस शिपायाचे नाव आहे. ७ एप्रिल ते २४ मेदरम्यान घडलेल्या संभाषणाअंती उपरोक्त दोन्ही आरोपींनी तक्रारकर्त्याकडे पाच हजारांची लाच मागितली होती.
मारहाण न करण्याचे आश्वासन
अमरावती : एसीबीकडे तक्रार नोंदविल्यानंतर अधिकाऱ्यांनी तक्रारीची चाचपणी केली. त्यात तडजोडीअंती आरोपींनी ५ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ७ एप्रिल रोजी संबंधित तक्रारकर्त्याने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारकर्त्याच्या भावाविरूद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल असून त्यात संपूर्ण मदत व भावाला मारहाण करणार नाही, यासाठी ढोबळे आणि अडागळे यांनी १० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजारांची रक्कम देण्याचे ठरले होते. याप्रकरणात एसीबीच्या पथकाने गुरूवारी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याघटनेमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.