गोवारींचे अर्धनग्न आंदोलन

By Admin | Updated: August 3, 2014 23:05 IST2014-08-03T23:05:04+5:302014-08-03T23:05:04+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळापासून गोवारींना आदिवासींच्या सवलती मिळत असताना शासनाने या सवलती बंद करून ११४ निष्पाप गोवारींचे बळी घेतले. तरीही मुख्य सवलती न दिल्यामुळे राज्यातील २४ लाख

Aroghanda movement of Gowari | गोवारींचे अर्धनग्न आंदोलन

गोवारींचे अर्धनग्न आंदोलन

सवलतीसाठी युवकांचे आंदोलन : नागपुरातून चालविली तयारी
धामणगाव रेल्वे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून गोवारींना आदिवासींच्या सवलती मिळत असताना शासनाने या सवलती बंद करून ११४ निष्पाप गोवारींचे बळी घेतले. तरीही मुख्य सवलती न दिल्यामुळे राज्यातील २४ लाख गोवारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत़ यासाठी नागपूर येथून आंदोलनाची तयारी असून अर्धनग्न आंदोलनाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले़
गोवारी ही मूळची आदिवासी जमात १० सप्टेंबर १९५६ रोजी अनुसूचित जमातीत गोवारीऐवजी गोंडगोवारी असा शब्द अंतर्भूत करण्यात आला आणि सर्व गोवारींना २३ एप्रिल १९८५ पर्यंत गोवारींनाही 'गोंडगोवारी' अशी प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली़ परंतु २४ एप्रिल १९८५ रोजी काँग्रेस शासनाने एक शासकीय अध्यादेश काढून गोवारींना अनुसूचित जमातीच्या मिळणाऱ्या सवलती काढून घेतल्या़ तेव्हापासून हा समाज न्याय्य हक्कासाठी लढा देत आहे़ एकीकडे या आदिवासी गोवारींची दुसरी पिढी सवलतीसाठी संघर्ष करीत गारद झाली. दुसरीकडे या गोवारींना सवलती मिळू नये म्हणून राज्यातील काही आदिवासींचे आमदार विरोध करीत असल्याचा आरोप गोवारी समाजाकडून होत आहे़ या आदिवासी गोवारी जमातीचे अस्तित्व स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे़ १८६९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या जनगणनेत गोवारी भाषा बोलणाऱ्यांची संख्या २ हजार ५१७ असल्याची नोंद इतिहासात आहे़ मार्टीन यांनी दिलेल्या अहवालात गोवारी ही एक आदिवासी जमात असल्याची नोंद आहे़ रिसेल आणि हिरालाल यांनी लिहिलेल्या पुस्तकात आदिवासी जमात अशा नोंदी या जमातीच्या नावाने आहे़ सी़पी़अ‍ॅन्ड बेरारच्या नोटीफिकेशनमध्ये ४ नोव्हेंबर १९४१ च्या शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये गोवारी ही मुळ आदिवासी असल्याचे स्पष्ट आहे़
राज्य शासनाने गोवारींना विशेष मागास प्रवर्गाच्या सवलती दिल्या. परंतु या सवलतीत गोवारींचा टिकाव लागत नसल्याची वस्तुस्थिती युवा शक्तीचे कार्याध्यक्ष नंदू सहारे यांनी मांडली आहे़ गत आठवड्यात नागपूर येथे संयुक्त समितीची बैठक झाली. गोवारी समाजाला न्याय्य हक्काच्या सवलतीपासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी राज्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ ७ आॅगस्ट रोजी नागपूर येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. गोवारी युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन संयुक्त समितीचे कैलास राऊत, नंदू सहारे, मारोतराव नेवारे, भाष्कर राऊत, शांताराम राऊत, श्रीराम नेवारे, ओंकार राऊत, जनार्दन दुधकवरे, प्रभू काळसर्पे, मुरके, गजानन कोहळे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Aroghanda movement of Gowari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.