सेनेतील एकदिली आश्चर्यकारक
By Admin | Updated: May 17, 2014 23:13 IST2014-05-17T23:13:25+5:302014-05-17T23:13:25+5:30
आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार झाल्यात तर आपल्या अस्तित्त्वाचाच प्रश्न उभा ठाकेल, अशी सुप्त भिती प्रत्येकच आमदाराच्या मनात डोकावू लागली होती. राणा यांच्या राजकीय उंचीचा चढता

सेनेतील एकदिली आश्चर्यकारक
>अमरावती : आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार झाल्यात तर आपल्या अस्तित्त्वाचाच प्रश्न उभा ठाकेल, अशी सुप्त भिती प्रत्येकच आमदाराच्या मनात डोकावू लागली होती. राणा यांच्या राजकीय उंचीचा चढता आलेख ज्या वेगाने वाढत होता, ती गती बघून कुण्याही राजकीय नेत्याचे याबाबत दुमत नव्हते. खरे तर विधिमंडळातील सहकारी या नात्याने राणा यांना सर्व सहा आमदारांशी विशेष जवळीक निर्माण करून परिपक्व राजकीय खेळी खेळता आली असती; परंतु राणा यांनी ती संधी अडसुळांना उपलब्ध होऊ दिली.
अमरावतीत वास्तव्य नसल्याची नाराजी सामान्यांमध्ये असली तरी आमदारांना विश्वासात घेऊन सामान्यांच्या त्या नाराजीवर अडसुळांनी रामबाण उपाय खूप आधीच योजला होता. अब की बार, मोदी सरकार ही लाट होतीच. अमरावतीतील मरगळेलल्या भाजपक्षामध्ये या लाटेने कमालीचा उत्साह संचारला. तिकीट शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाले असा जराही भाव भाजपजनांमध्ये जाणवत नव्हता. जणू तिकीट भापलाच असावे, असा उत्साहाचा भर भाजपमध्ये होता. संघाच्या पठडीत तयार झालेले मुरब्बी स्थानिक नेते कसोशीने कामाला लागले होते. मोदी यांनी मंजूर केलेल्या सभांमध्ये अमरावतीचा नामोल्लेख पूर्वी नव्हताच. ऐनवेळी ती मिळविणे आणि मोदी खूश होतील अशी गर्दी जमविणे हे दिव्य भाजपजनांनी तीन ते चार दिवसांत पार पाडले होते. संकल्पाच्या जोरावरच ते शक्य होऊ शकले होते. मोदींनी अमरावतीच्या सभेत बाळासाहेबांचा आदरपूर्वक उल्लेख केल्यामुळे शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले. त्यानंतर अचानक शिवसेना ज्या एकदिलाने कामाला लागली, ते आश्चर्यच होते. उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत येऊन शिवसैनिकांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षेचा मनापासून मान राखण्यात आला. अंतर्गत कलह म्हणूनच शिवसैनिकांनी बाजूला सारला.
मतदानाच्या दिवशी मतदारांची नावे गहाळ झाल्यामुळे उडालेला गोंधळ प्रवीण पोटे, दिगंबर डहाके, सोमेश्वर पुसतकर, किरण पातूरकर, संजय बंड, यांच्यासारख्या नेत्यांनी कौशल्याने हाताळला. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून, तक्रारींचे काय ते मग बघू. हाती आहे त्यातील अधिकाधिक मतदान कसे करवून घेता येईल यासाठी फळी कामाला लाऊ, असा आग्रह या नेत्यांनी धरला. गोंधळी स्थितीमुळे मोठय़ा प्रमाणात होऊ शकणारी हानी त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आटोक्यात आली.
अडसूळ यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, स्त्रिचारित्र्याच्या मुद्यावरून त्यांची झालेली कोंडी, बाहेरचे पार्सल असा विरोधकांनी ताकदीने केलेला प्रचार यापैकी कुठल्याही नकारात्मक मुद्यांचा स्वत:वर प्रभाव होऊ न देता भाजप-सेनेच्या बहाद्दरांनी केलेल्या अथक परिश्रमाचा सुगंध आता दरवळतोय. अमरावतीकरांनी टाकलेल्या विश्वासाचे आनंदराव सोने करतीलच, अशी अपेक्षा तमाम अमरावतीकरांना आहे.