मोकाट जनावरे पकडणाऱ्या पथकावर सशस्त्र हल्ला
By Admin | Updated: September 24, 2014 23:23 IST2014-09-24T23:23:42+5:302014-09-24T23:23:42+5:30
मोकाट जनावरे पकडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर पिता- पुत्रांसह दहा जणांनी सशस्त्र हल्ला केला. गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत तपोवन गेटच्या आत मंगळवारी दुपारी ४ वाजता

मोकाट जनावरे पकडणाऱ्या पथकावर सशस्त्र हल्ला
अमरावती : मोकाट जनावरे पकडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर पिता- पुत्रांसह दहा जणांनी सशस्त्र हल्ला केला. गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत तपोवन गेटच्या आत मंगळवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन पिता- पुत्राला अटक केली आहे. शेख आरीफ शेख बब्बू व त्याचा मुलगा शेख अमीर ऊर्फ गोलू अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी सचिन छगनआप्पा बोंद्रे व नऊ कर्मचारी मंगळवारी दुपारी ४ वाजता तीन वाहनांसह तपोवन गेट येथे मोकाट जनावरे पकडत होते. दरम्यान शेख आरीफ, त्याची दोन मुले शेख अमीर, शेख जमील यांनी महापालिकेच्या तीन वाहनांची तोडफोड करुन पथकातील कर्मचाऱ्यांवर तलवार, लोखंडी पाईपने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अब्दुल रफीक, नियाअत खान, अशोक धनगवने हे तिघे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक पुंडकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन याप्रकरणी आरोपींविरुद्ध जमावबंदी करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करुन प्राणघातक हल्ला करण्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन त्यांनी शेख आरीफ व शेख अमीर या दोघांना अटक केली.
हे पिता-पुत्र पोलीस रेकॉर्डवरील जुने गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. (प्रतिनिधी)