कपाशीचे क्षेत्र अंशत: वाढणार
By Admin | Updated: May 4, 2015 00:26 IST2015-05-04T00:26:47+5:302015-05-04T00:26:47+5:30
मागील हंगामात कापसाला मिळालेला अल्प दर, सरासरीपेक्षा कमी पाऊस, अवकाळी व गारपीट यामुळे यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट...

कपाशीचे क्षेत्र अंशत: वाढणार
प्रि-मान्सून निम्म्यावर : यंदा दोन लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी
गजानन मोहोड अमरावती
मागील हंगामात कापसाला मिळालेला अल्प दर, सरासरीपेक्षा कमी पाऊस, अवकाळी व गारपीट यामुळे यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची अपेक्षा होती. मात्र, झाले उलट. यंदा कपाशीचे पेरणीक्षेत्र अंशत: ४ हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खालवल्याने प्रि-मान्सूनचे पेरणीक्षेत्र मात्र निम्म्यावर राहणार आहे.
खरिपाला अवघा एक महिना शिल्लक असल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या हंगामात सुरूवातीपासून हमी भावापेक्षा कापसाला कमी दर मिळाले. त्यावेळी सुरुवातीपासूनच कापसाचे भाव २८०० ते ३००० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते. मार्चनंतर मात्र कापसाने ४ हजार रूपये प्रति क्विंटलपर्यंत मजल मारली. सरकारने बोनस देण्याचे जाहीर केले. परंतुु अद्याप घोषणेची पूर्तता झाली नाही.
आता खरिपाचा नवीन हंगाम सुरु होणार आहे. मागील वर्षीच्या बोनसबाबत शासनाकडून अद्याप कोणतीच हालचाल नाही. गेल्या हंगामात सोयाबीन उद्ध्वस्त झाल्याने यंदा कपाशीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वर्षी १ लाख ९७ हजार हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झाली होती. तेवढेच क्षेत्र जवळपास यावर्षीदेखील कायम आहे.
२० हजार हेक्टर सोयाबीन क्षेत्र वाढ
गेल्या हंगामातील सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त झाले. यंदा समाधानकारक पावसाळा असल्याचे हवामान खात्याने म्हटल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोयाबीनवर विश्वास ठेवल्याचे चित्र आहे. मागील वर्षी ३ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून यंदा ३ लाख ४० हजार हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे.
साडेतीन लाख क्विंटल कपाशी बियाण्यांची गरज
यंदा २ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पेरणी क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी किमान साडेतीन लाख क्विंटल कपाशीचे बियाणे लागणार आहेत. खासगी कंपनीद्वारा हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे. ब.जी.-२ ची ९ लाख ६० हजार पाकिटे लागणार आहेत.
तुरीचे क्षेत्र स्थिर
यंदा ९९ हजार ५०० हेक्टर तुरीचे पेरणीक्षेत्र प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी ९८ हजार ८९८ हेक्टर पेरणी क्षेत्र होते. यंदाच्या खरिपातील तुरीचे पेरणीक्षेत्र स्थिर राहणार असल्याचे चित्र आहे. आंतरपिक म्हणूनही तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.