राजुऱ्याच्या बँकेत अर्धनग्न आंदोलन
By Admin | Updated: June 14, 2016 00:09 IST2016-06-14T00:09:41+5:302016-06-14T00:09:41+5:30
बँक प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत असल्याने ...

राजुऱ्याच्या बँकेत अर्धनग्न आंदोलन
कर्ज देण्यास टाळाटाळ : शासनाच्या आदेशाला केराची टोपली
राजुराबाजार : बँक प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत असल्याने युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात बँकेत अर्धनग्न आंदोलन केले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.
खरीप हंगामाला सुरुवात होऊन १० ते १२ दिवस लोटले. पावसाने पाठ फिरविली असली तरी मशागत करून ठेवलेली जमीन पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने पीककर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकांच्या पायऱ्या झिजविण्यापलीकडे ेकाहीच होत नाही. असाच प्रकार राजुराबाजार येथील सेंट्रल बँकेत घडला. शेतकऱ्यांनी येरझरा मारल्या असताना केवळ बँक प्रशासनाच्या हेकेखोर वृत्तीमुळे शेतकरी त्रस्त होवून पीक निघण्यापूर्वीच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी शेकडो शेतकऱ्यांसह बँकेत ठिय्या दिला व अर्धनग्न आंदोलनही केले. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. यावेळी बँक प्रशासनाविरुद्ध नारेबाजी करून शासनाच्या आदेशालाही केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी शाखा व्यवस्थापक रामटेके यांनी पोलिसांना पाचारण केले. ठाणेदार गोरख दिवे यांनी ताफ्यासह राजुराबाजार येथे दाखल होऊन बँक प्रशासन आणि आंदोलनकर्त्यासोबत चर्चा केली. बँकेतील कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तातडीने शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे तसेच कर्जाचे पुनर्गठन प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले. १५ दिवसांत कर्ज प्रकरणे निकाली काढण्याचा इशारा देवेंद्र भुयार यांनी दिला. आंदोलनात देवेंद्र भुयारसह सुनील काकडे, जितू बहुरुपी, आेंकार बहुरुपी, मंगेश तट्टे, विनोद डाफे, पिंटू देशमुख, सुधाकर बनसोड, सूरज धांडे, गाजनन सकर्डे, योगेश कासे, गुलाब तट्टे यांची उपस्थित होते.