दस्तुरनगरातील अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: July 8, 2016 00:03 IST2016-07-08T00:03:32+5:302016-07-08T00:03:32+5:30
शहरातील वाढते अतिक्रमण शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत होते. महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने दुसऱ्या दिवसीही संयुक्त कारवाई करुन दस्तुरनगर चौक व फर्शी स्टॉप चौकातील अतिक्रमण काढण्यात आले आहे.

दस्तुरनगरातील अतिक्रमण हटविले
कारवाईचा दुसरा दिवस : पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अमरावती : शहरातील वाढते अतिक्रमण शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत होते. महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने दुसऱ्या दिवसीही संयुक्त कारवाई करुन दस्तुरनगर चौक व फर्शी स्टॉप चौकातील अतिक्रमण काढण्यात आले आहे.
या कारवाईमुळे अतिक्रमितांचे धाबे दणाणले आहे. मिनी बायपास दस्तुरनगर चौकातील गौरक्षण लगत भाजी मंडईत शेतकरी भाजीपाला विक्रीस आणत होते. महापालिकेने त्यांना ही जागा दिली होती. परंतु या जागेवर खासगी भाजीपाला विक्रेत्यांनी ताबा घेतल्यामुळे येथे नेहमी वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच येथे पानठेले व किरकोळ व्यवसाय थाटले होते. येथे उघड्यावरच मांस विकले जात होते. मांस विक्रेत्यांनी येथे अतिक्रमण केले होते. या सर्वांचे अतिक्रमण काढण्यात आले. भाजीमंडी चौकातील २५ ते ३० व्यावसायिकांचे अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. यावेळी अतिक्रमितांनी व मांस विक्रेत्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाला विरोध केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या उपस्थितीत येथील गोपी रेस्टॉरेन्टचे अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमितांनी दहा ते बारा हजार चौरस फुटांवर केलेले अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले. या कारवाईत शेकडो पोलीस अधिकारी,महापालिका अधिकाऱ्यांचा ताफा सहभागी होता. बुधवारी गाडगेनगरसह शहरातील विविध भागांतील अतिक्रमण काढण्यात आले. महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी शहरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहे. (प्रतिनिधी)
अतिक्रमितांचा प्रशासनाला विरोध
दस्तुरनगरात जेसीबी चालताच अतिक्रमण काढण्यासाठी काही मांस विक्रेत्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना विरोध दर्शविला पण त्याच्या विरोधाला भीक न घालता येथे पोलीस आयुक्तांचे आगमन होताच त्यांच्या उपस्थितीत अतिक्रणाचा सफाया करण्यात आला. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते.