मंजूर ले-आऊटची नझूलमध्ये नोंद नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST2021-02-12T04:12:40+5:302021-02-12T04:12:40+5:30
श्यामकांत पाण्डेय धारणी : ग्रामपंचायत दिया अंतर्गत येत असलेल्या सर्व्हे नंबर १३२ सध्या रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे चर्चेला आलेला आहे. ...

मंजूर ले-आऊटची नझूलमध्ये नोंद नाही!
श्यामकांत पाण्डेय
धारणी : ग्रामपंचायत दिया अंतर्गत येत असलेल्या सर्व्हे नंबर १३२ सध्या रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे चर्चेला आलेला आहे. या सर्व्हे नंबरमधील खरेदी-विक्री व्यवहार तलाठ्यांकडील नमुना ब आणि ग्रामपंचायतकडील नमुना ८-अ च्या आधारावर सर्रास सुरू आहेत. या मंजूर ले-आऊटची नझूल दफ्तरी नोंद नाही.
सर्व्हे नंबर १३२ धारणी शहराला लागून मौजा तलाईमध्ये येते. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्याचे काम ग्रामपंचायत दियाचे आहे. मात्र, ग्रामपंचायतने या सर्व्हे नंबरकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पायाभूत सुविधेपासून वंचित असलेल्या या सर्व्हे नंबरमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार समोर येत आहेत. मंजूर ले-आऊटमध्ये प्रत्येक भूखंडानंतर उत्तर-दक्षिण ३० फुटांचा रस्ता असून, प्रत्येक दोन भूखंडादरम्यान पूर्व-पश्चिम गल्लीसुद्धा देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्यास गल्ली बेपत्ता झाली असून, तीस फुटांचा रस्तासुद्धा हळूहळू अतिक्रमणधारकांच्या रडारवर आहे.
बॉक्स
सर्व्हे नंबर १३२ तलाई हा जुना सर्व्हे नंबर असून, तहसीलदारांमार्फत लेआऊट मंजूर करून घेण्यात आले आहे. परंतु, सदर ले-आऊटची नोंद नझूल विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे जेव्हा कधी यामधील भूखंडांची मोजणी करण्याची वेळ येते तेव्हा एकमात्र उपलब्ध मंजूर ले-आऊटमधील नकाशा उपयोगात आणला जातो. हा नकाशासुद्धा जीर्णावस्थेत पोहोचला आहे.
महसूलकडेही नोंद नाही
सर्व्हे नंबर १३२ मौजा तलाई अंतर्गत येत असला तरी धारणी शहराला लागून असल्यामुळे या सर्व्हे नंबरचे गावठाणामध्ये रूपांतरण झाले आहे. असे करीत असताना हा सर्वे नंबरकुठून कुठपर्यंत आहे याबाबत महसूल दस्तावेजमध्ये उल्लेख आढळून येत नाही. तलाई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून पूर्वेकडे हा सर्व्हे नंबर प्रारंभ होतो आणि पूर्वेकडे शेवटचे टोक कुठे मिळते, याचा उलगडा प्राप्त नकाशामध्ये होत नसल्याचे नझूल विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे मोजणी करताना नझूल विभागाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.