अर्जुननगरात ‘त्या’ जागेवर वाचनालयाला मंजुरी
By Admin | Updated: January 20, 2016 00:36 IST2016-01-20T00:36:32+5:302016-01-20T00:36:32+5:30
लोकायुक्तांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने येथील अर्जूननगरातील अतिक्रमित धार्मिक स्थळ हटविण्याबाबतची कारवाई सोमवारी केली.

अर्जुननगरात ‘त्या’ जागेवर वाचनालयाला मंजुरी
निर्णय : प्रदीप दंदे, प्रकाश बनसोड, प्रशांत वानखडे, प्रदीप बाजड यांचा पुढाकार
अमरावती: लोकायुक्तांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने येथील अर्जूननगरातील अतिक्रमित धार्मिक स्थळ हटविण्याबाबतची कारवाई सोमवारी केली. मात्र या जागेवर वाचनालय निर्मितीसाठी मंगळवारी आमसभेत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विशिष्ट समाजाच्या दुखावलेल्या भावनांना महापालिकेने न्याय दिल्याचे स्पष्ट झाले. यासाठी नगरसेवक प्रदीप दंदे यांनी मोलाची भूमिका बजावली.
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली आमसभा पार पडली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपमहापौर शेख जफर, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाजात सहभाग घेतला. दरम्यान नगरसेवक दंदे यांनी अर्जुननगरातील अतिक्रमित धार्मिक स्थळाबाबत सविस्तर माहिती सादर केली. प्रशासनाने पहाटे पाच वाजता पोलीस बंदोबस्तात हे स्थळ हटविण्याची कारवाई केली. प्रशासन अतिक्रमित धार्मिक स्थळ हटविताना पक्षपात करीत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही, असे दंदे म्हणाले. महिलांच्या मागणीनुसार सावित्रीबाई फुले वाचनालयासाठी जागा देण्याबाबतचा प्रस्ताव असून याला मान्यता प्रदान करावी, अशी मागणी दंदे यांनी केली. त्यानंतर नगरसेवक अजय गोंडाणे, प्रकाश बनसोड, मालती दाभाडे, अंबादास जावरे, निर्मला बोरकर, भूषण बनसोड, गुंफाबाई मेश्राम, दीपमाला मोहोड आदींनी अतिक्रमण हटविल्याबाबत संताप व्यक्त केला. चर्चा सुरु असताना प्रेक्षक गॅलरीत अर्जूननगरातील महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. दरम्यान या महिलांकडून गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. दरम्यान शिवसेनेचे प्रशांत वानखडे, दिगंबर डहाके, प्रवीण हरमकर, प्रदीप बाजड, राजेंद्र तायडे, मंजुषा जाधव आदींनी मत नोंदविले. मात्र परिसरातील सदस्य स्वाती निस्ताने, राजू मानकर यांचे मत जाणून घेण्याबाबत चर्चा झाली.
सदस्यांच्या मागणीनुसार परिसरातील दोन्ही सदस्यांना विश्वासात घेवून अर्र्जूननगरातील खुल्या भुखंडातील १० टक्के जागा ही वाचनालयास देण्याचा ठराव पारीत झाला. या विषयाला मंजूर व कायम करण्याचा निर्णय घेतला.
-चरणजितकौर नंदा,
महापौर, महापालिका.