परीक्षा समन्वयक नियुक्तीचा फज्जा
By Admin | Updated: January 13, 2017 00:07 IST2017-01-13T00:07:04+5:302017-01-13T00:07:04+5:30
परीक्षा विभागाशी निगडित प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठात ये-जा करण्याचा प्रसंग उद्भवूू नये,

परीक्षा समन्वयक नियुक्तीचा फज्जा
प्राचार्यांची अनास्था : ४१० पैकी ८१ समन्वयकांचे काम समाधानकारक
अमरावती : परीक्षा विभागाशी निगडित प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठात ये-जा करण्याचा प्रसंग उद्भवूू नये, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात परीक्षा समन्वय नियुक्ती करण्याचे पत्र प्राचार्यांना पाठविल. मात्र त्या पत्राला प्राचार्यांनी फारशे गांभीर्याने घेतले नाही. केवळ ४१० पैकी ८१ समन्वयकांचेच काम समाधानकारक असल्याची माहिती हाती आली आहे.
संत गाडगेबाबा विद्यापीठाने अधिसूचनेनुसार २९ आॅगस्ट २०१५ रोजी एकूण ४१० महाविद्यालयांत प्राध्यापकांना परीक्षा सुधार योजनेंतर्गत परीक्षा समन्वयक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला होता. याची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबतचे पत्र परीक्षा नियंत्रक जयंत वडते यांनी प्राचार्यांना पाठविले होेते. मात्र ४१० पैकी केवळ २६६ महाविद्यालयात परीक्षा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. त्यातही ८१ परीक्षा समन्वयकांचे कामकाज समाधानकारक असल्याचे प्राचार्यांनी पाठविलेल्या शिफारस पत्राद्वारे सिद्ध झाले आहे. महाविद्यालयांच्या कारभारावर विद्यापीठाने नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे. परंतु विद्यापीठाकडून जाणाऱ्या पत्राला प्राचार्यांनी प्रतिसाद देऊ नये, ही बाब लाजीरवाणी मानली जात आहे. महाविद्यालयात परीक्षा समन्वयकपदी एका प्राध्यापकांची नियुक्ती करण्याचे निर्देश विद्यापीठाने प्राचार्यांना दिले होेते. परीक्षा समन्वयकपदी नियुक्ती झालेल्या सदर प्राध्यापकाला कामकाजासाठी पाच हजार रुपयांचे मानधन दरवर्षी मिळणार होेते. परंतु ६० टक्के महाविद्यालयांमध्ये परीक्षा समन्वयकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्राचार्यांनीच परीक्षा समन्वयक नियुक्तीचा फज्जा उडविला आहे. गतवर्षी नियुक्तीनंतर परीक्षा समन्वयकांच्या कार्याचा आढावा घेतला तर तो धक्कादायक आहे. १२५ महाविद्यालयांनी परीक्षा समन्वयकांचे मानधन देण्यासाठी विद्यापीठात प्रस्ताव पाठविला आहे. त्यापैकी ८१ प्राचार्यांनीच परीक्षा समन्वयकांचे काम समाधानकारक असल्याचे शिफारस पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी परीक्षा समन्वयकपदी प्राध्यापकांना तीन वर्षे नेमणूक देण्याची नियमावली होती. मात्र ४१० पैकी २६६ महाविद्यालयात परीक्षा समन्वकांची नेमणूक करण्यात आली आहे. तर ८१ परीक्षा समन्वयक खऱ्या अर्थाने काम करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या हितासाठी की प्राचार्य, प्राध्यापकांच्या वेतनासाठी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)