सरकारी अभियोक्ता नियुक्त
By Admin | Updated: February 3, 2016 00:13 IST2016-02-03T00:13:10+5:302016-02-03T00:13:10+5:30
अचलपूर येथील बहुचर्चित अमित मोहन बटाऊवाले हत्याकांड प्रकरणात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता ...

सरकारी अभियोक्ता नियुक्त
अचलपुरातील प्रकरण : तिघांच्या जामिनावर १० ला युक्तिवाद
परतवाडा : अचलपूर येथील बहुचर्चित अमित मोहन बटाऊवाले हत्याकांड प्रकरणात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती केली असून त्यांनी मंगळवारी प्रथम येथील न्यायालयात प्रथम भेट दिली. या प्रकरणातील तीन आरोपींच्या जामिनावर १० फेब्रुवारी रोजी युक्तिवाद होणार आहे.
अचलपूर शहरातील अमित बटाऊवाले या तरूणाची १० आॅगस्ट रोजी वाळू माफियांनी निर्दयीपणे हत्या केली होती. त्याचे वडील मोहन बटाऊवाले यांना गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी १५ ही आरोपींना अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या अमित बटाऊवाले हत्याकांड प्रकरणात शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता उमेशचंद्र यादव यांची २० डिसेंबर २०१५ रोजी नियुक्ती केली.
आरोपीचे वकील गैरहजर
परतवाडा : अटकेतील पंधरा आरोपींपैकी अर्शद, अनवर व आदिल या तीन आरोपींच्या जामिनासाठी अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात मंगळवारी युक्तिवाद होता. मात्र, आरोपींचे वकील काही कारणास्तव उपस्थित न राहिल्याने आता १० फेब्रुवारी रोजी त्यावर युक्तिवाद होणार आहे. विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त उमेशचंद्र यादव यांचेकडे जवखडे हत्याकांड, अकोला किडनी रॅकेट व आर्थिक गुन्हे शाखेची बहुचर्चित प्रकरणे सुद्धा आहेत. तर सहायक सरकारी वकील डी. एन. नवले वकील कामकाज पाहणार आहेत. बटाऊवाले हत्याकांड प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती.