‘एक अग्रवाल, एक शेतकरी’ दत्तक योजना राबवा
By Admin | Updated: January 4, 2015 23:04 IST2015-01-04T23:04:05+5:302015-01-04T23:04:05+5:30
राज्यात दुष्काळ, नापिकी, अस्मानी संकटाने शेतकरी आत्महत्या करीत आहे. बळीराजा जगला तर समाज जगेल, अन्यथा समाजाला अन्न कोण पुरवेल, हा खरा प्रश्न आहे.

‘एक अग्रवाल, एक शेतकरी’ दत्तक योजना राबवा
अमरावती : राज्यात दुष्काळ, नापिकी, अस्मानी संकटाने शेतकरी आत्महत्या करीत आहे. बळीराजा जगला तर समाज जगेल, अन्यथा समाजाला अन्न कोण पुरवेल, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या अग्रवाल समाजाने शेतकऱ्याला संकटातून वाचविण्यासाठी ‘एक अग्रवाल, एक शेतकरी’ दत्तक योजना राबविण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे रविवारी केले.
येथील एका आलीशान हॉटेलमध्ये अग्रवाल समाजाचे २१ वे राज्यस्तरीय दोन दिवसीय संमेलनाच्या नवरत्न सन्मान सोहळ्याच्या वितरणाप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अग्रवाल समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मेरठचे खा. राजेंद्र अग्रवाल, आ. गोपीकिशन बाजोरिया, गोपालदास अग्रवाल, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, रामविलास गुप्ता, मनोहर भूत, भालचंद्र गनेडिवाल, पन्नालाल अग्रवाल, गजेंद्र केडीया, मालती गुप्ता, संजय अग्रवाल, किशोर गोयनका, सुनील अग्रवाल, दीपक अग्रवाल, राजेश अग्रवाल, ओ.पी. अग्रवाल, मुरारीलाल सराफ आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, अग्रवाल समाज हा कष्टाने मोठा झाला असून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आहे. राज्य नव्हे, तर देशभरात या समाजाचे जाळे पसरले आहे. महाराजा अग्रेसन यांच्या विचारसरणीनुसार मानवता धर्म अंगिकारुन प्रत्येक अग्रवालांनी एक शेतकरी दत्तक घेऊन त्याच्यावर आलेल्या संकटातून सावरावे, असे आवाहन त्यांनी केले. नामशेष होत असलेले गोेवंश वाचविण्यासाठी अग्रवाल समाजाने पुढाकार घेत त्यांच्याकडे असलेल्या जागेवर गोधन जपावे, असे ते म्हणाले. शेतकरी दत्तक ही योजना राबविताना अग्रवाल समाजाने गाईचे संगोपन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ना. प्रवीण पोटे, खा. राजेंद्र अग्रवाल, आ. गोपीकिशन बाजोरिया यांचा तिरुपती सत्कार करण्यात आला.
दरम्यान अतिथींच्या हस्ते किशोर गोयनका, विजय मित्तल, मनोहर भूत, नंदकिशोर गोयल, प्रदीप मेहाडिया, कमलकिशोर अग्रवाल, संतोष भूत आदींना अग्रश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अग्रभूषण पुरस्कार मुरारीलाल सराफ यांना गौरविण्यात आले. शनिवारी अग्रवाल समाजाचे महिला संमेलन तर हास्य कविसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला आ. सुनील देशमुख, माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, संजय अग्रवाल यांची उपस्थिती होती. समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०१ समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)