काळवीटाचा सांगाडा आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:25+5:302021-03-13T04:23:25+5:30
उतखेड शिवारातील घटना, वडाळी वनपरिक्षेत्राची कारवाई पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोहरा वर्तुळातील उतखेड बीटनजीकच्या अ-हाड गावाच्या एका ...

काळवीटाचा सांगाडा आढळला
उतखेड शिवारातील घटना, वडाळी वनपरिक्षेत्राची कारवाई
पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोहरा वर्तुळातील उतखेड बीटनजीकच्या अ-हाड गावाच्या एका शेतातील इमारतीवर आढळलेला काळवीटचा सांगाळा वडाळी वनविभागाने ताब्यात घेतला.
अ-हाड या गावाच्या परिसरात गोपाल यादव नामक (रा. सबनिस प्लॉट, अमरावती) यांच्या मालकीच्या शेतात राजापेठ पोलीस पथक आरोपीच्या शोधात गेले असता, शेतातील इमारतीवर काळवीटचा सांगाडा आढळून आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता उघडकीस येताच त्यांनी त्या घटनेची माहिती पोहरा वर्तुळातील उतखेड बीटचे वनरक्षक जगदीश गोरले यांना दिली. त्यांनी संबंधित वडाळी वनपरिक्षेत्र अधकारी कैलास भुंबर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून शेतातील इमारतीवर चढून पाहणी केली असता, त्यांना शेतातील इमारतीवर शेड्यूल एकमध्ये मोडल्या जाणाऱ्या वन्यप्राणी काळवीटचे मुंडके, शिंगे, केस, हाडे शरीरापासून वेगळे असे अवयव पाहणी दरम्यान दिसून आल्याने शिकार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्या इमारतीवरून विविध अवयव वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात पोहरा वर्तुळ अधिकारी बी.आर. पानसे, वनरक्षक जगदीश गोरले, संरक्षण मजूर धारा जाधव या पथकाने ताब्यात घेऊन पोहरा कार्यालयात आणले. या घटनेचा पुढील तपास वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांनी चालविला आहे.