परीक्षेपूर्वीच उत्तरे विद्यार्थ्यांच्या हाती

By Admin | Updated: September 25, 2015 00:57 IST2015-09-25T00:57:19+5:302015-09-25T00:57:19+5:30

शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Answers before exams in the hands of the students | परीक्षेपूर्वीच उत्तरे विद्यार्थ्यांच्या हाती

परीक्षेपूर्वीच उत्तरे विद्यार्थ्यांच्या हाती

पायाभूत चाचणी परीक्षा : शासन निर्णयाला शाळा व्यवस्थापनाची तिलांजली
वैभव बाबरेकर  अमरावती
शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आधीच परीक्षेची उत्तरे सांगून शिक्षकांनी या पायाभूत चाचण्यांचा पार कचरा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा कसा उच्च आहे, हे दर्शविण्यासाठी सर्रास हा प्रकार विविध शाळांच्या व्यवस्थापनाकडून केला जात आहे. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचे चित्र आहे.
शासनाने शिक्षणाच्या दर्जा उंचाविण्यासाठी व विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचण्या घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, त्यांचा शैक्षणिक दर्जा आदींचा आढावा घेण्याचा शासनाचा उद्देश आहे.
जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक अशा २ हजार २०० शाळा आहेत. या शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. गतवर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले आहेत. या परीक्षेचे स्वरूप नेहमीच्या परीक्षेपेक्षा वेगळे आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयी आणि त्यांच्या क्षमतेनुसार तणावरहित वातावरणात ही परीक्षा घेण्यात येत आहे. १४ ते ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ही पायाभूत चाचणी घेण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत.
सर्वच ठिकाणी एकाच वेळी किंवा एकाच दिवशी ही चाचणी परीक्षा घेणे बंधनकारक नाही. त्यामुळे विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार विविध वेळेत ही परीक्षा घेतली जात आहे.

विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यासाठी शासनाने पायाभूत चाचण्या घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, प्रश्नांची उत्तरे जर विद्यार्थ्यांना आधीच सांगितली जात असतील तर ते चुकीचे आहे. हा प्रकार थांबविण्याच्या सूचना शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत देऊ.
-अशोक सोनवणे,
प्र. शिक्षण उपसंचालक.

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणीला सुरुवात झाली आहे. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. यात काही गैरप्रकार होत असतील तर संबंधित शाळेची चौकशी करण्यात येईल.
- श्रीराम पानझाडे,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक).

आमच्या शाळेत असे चुकीचे प्रकार घडत नाहीत, याबाबत शहानिशा करायची असल्यास मुलांनाही विचारू शकता. सर्व चाचणी परीक्षा सुव्यवस्थित पार पडत आहेत.
- सुषमा देशमुख,
मुख्याध्यापिका (प्राथमिक)

असे काहीच झाले नाही. पायाभूत चाचणी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका नेटवर उपलब्ध आहेत. त्यातच काही विद्यार्थ्यांचे पालक स्वत: शिक्षक आहेत. त्यामुळे नेटवरून ते प्रश्नपत्रिका काढू शकतात. आम्ही १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांचा सराव घेत आहोत. अत्यंत गोपनीय व नियमानुसार परीक्षा घेतली जाते.
- उज्ज्वला कुळकर्णी,
मुख्यध्यापिका (माध्यमिक)

 

Web Title: Answers before exams in the hands of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.