आणखी एक फ्लॅट फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:07 IST2019-01-12T23:06:45+5:302019-01-12T23:07:05+5:30
शहरात घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी शनिवारी फ्रेजरपुरा हद्दीतील एका बंद फ्लॅटधून ५९ हजारांचा ऐवज लंपास केला. आतापर्यंत शहरातील आठ फ्लॅट फोडण्यात आले आहे.

आणखी एक फ्लॅट फोडला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी शनिवारी फ्रेजरपुरा हद्दीतील एका बंद फ्लॅटधून ५९ हजारांचा ऐवज लंपास केला. आतापर्यंत शहरातील आठ फ्लॅट फोडण्यात आले आहे.
पोलीस सूत्रानुसार, सर्कीट हाऊससमोरील दिलखुलास हेरिटेज अर्पाटमेंटमध्ये तिसऱ्या माळ्यावर राहणारे विवेक कामत यांचे तळमजल्यावर व्यापारी प्रतिष्ठान आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता ते मुलाला शाळेतून आणायला गेले होते, तर त्यांची शिक्षिका पत्नी ड्युटीवर होत्या. दाराला कुलूप लावून तासभरात विवेक परतले असता, त्यांना दाराचा कडीकोंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, आलमारीतील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यांनी घटनेची माहिती फे्रेजरपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी घरातील दागिने, घड्याळ व कॅमेरा असा एकूण ५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेच्या माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. याशिवाय ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण केले होते.
फ्लॅट फोडणारी टोळी?
शहरात फ्लॅटच्या दारांचा कडीकोंडा तोडून चोरी होत आहे. दोन महिन्यांत आठ फ्लॅट फोडले. अशी टोळीच सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पोलिसांना अद्याप चोरांचा सुगावा लागलेला नाही.