अंजनगावचा लाचखोर ‘पीएसआय’ जेरबंद
By Admin | Updated: March 5, 2016 00:10 IST2016-03-05T00:10:23+5:302016-03-05T00:10:23+5:30
गुन्ह्यातील कलम हटविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाला गुरुवारी रात्री रंगेहात पकडण्यात आले.

अंजनगावचा लाचखोर ‘पीएसआय’ जेरबंद
पाच हजारांची लाच : एसीबीची कारवाई
अंजनगाव सुर्जी : गुन्ह्यातील कलम हटविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाला गुरुवारी रात्री रंगेहात पकडण्यात आले. छत्रपती भिकाजी धावट (५६) असे या उपनिरीक्षकाचे नाव असून तो अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री १०.३५ मिनिटांनी ही कारवाई केली. अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात भादंविच्या कलम ३१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील कलम ३९२ हटविण्यासाठी व तक्रारकर्त्याचा मित्र असलेल्या अमोल तायडे याला गुन्ह्यातून काढण्यासाठी पाच हजार रूपये आणि चार्जशिट दाखल केल्यानंतर ७५०० रूपये अशा एकूण १२,५०० रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला होता. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती.
प्रवेशद्वाराजवळ अटक
अमरावती : एसीबीच्या पथकाने गुरुवारी अंजनगाव सुर्जी गाठून तक्रारीची पडताळणी केली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक छत्रपती धावट याने अमोल तायडे याचे नाव गुन्ह्यातून काढल्याची कागदपत्रे दाखवीत पाच हजार रुपये लाच मागितली. रक्कम स्वीकारताना त्याला ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ अटक केली गेली.
एसीबीचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे, एएसआय कैलास सानप, अक्षय हरणे, सय्यद ताहेरअली, धीरज बिरोले, अकबर हुसेन यांनी ही कारवाई केली. अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, उपअधीक्षक आर.बी.मुळे यांनीही या कारवाईत मार्गदर्शन केले.