अंजनगाव सुर्जीत चोरांचे पोलिसांना आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:16 IST2021-08-28T04:16:46+5:302021-08-28T04:16:46+5:30
मनोहर मुरकुटे-अंजनगाव सुर्जी : शहरात दोन महिन्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून २६ ऑगस्टला देवगिरेनगर येथील रामेश्वर ठाकरे ...

अंजनगाव सुर्जीत चोरांचे पोलिसांना आव्हान
मनोहर मुरकुटे-अंजनगाव सुर्जी : शहरात दोन महिन्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून २६ ऑगस्टला देवगिरेनगर येथील रामेश्वर ठाकरे आणि बालाजीनगरातील वासुदेव जायले यांच्या घरी चोरांनी दिवसा ढवळ्या कुलूप तोडून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने व नगदी ऐवज लंपास केल्याने एकच खळबळ उडाली. त्याअगोदर दोन दिवसांपूर्वीच टाकरखेड मार्गावर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याने पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे मोठे आव्हाण उभे ठाकले आहे. चोरांचा अद्याप सुगावा न लागल्यामुळे शहरवासी चिंतेत आहे. त्यातच २० ऑगस्टला न्यायालयाजवळील मोहमदिया नगरात रात्री ८ ते १० वाजता दरम्यान चोरांनी ५.३७ लाखांचा ऐवज लुटून नेल्याने शहरवासीयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यात कर्तव्यदक्ष ठाणेदार दीपक वानखडे यांच्यासमोर शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे अधिकच जबाबदारी वाढली आहे.
या दोन्ही घटना थोड्याच अंतराने घडल्याने चोरी करणारी टोळी ही पाळत ठेवूनच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकाचा दिवशी आणि तेही भरदिवसा दोन धाडशी घरफोड्या व एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बघणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घरफोडी करणाऱ्या या टोळीला जेरबंद करणे हे नव्याने रुजू झालेले अंजनगावचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्यासमोर आव्हान ठरत आहे. या घटनेमुळे अंजनगाव पोलीस चोरांचा शोध घेण्यासाठी आपली कसब पणाला कशी लावतात की आणखी घटनेत वाढ होणार ह्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे
बॉक्स
चोरांनी असा साधला डाव
देवगिरेनगर येथील रामेश्वर ठाकरे यांच्या पत्नी व सून खरेदीसाठी बाजारात व रामेश्वर ठाकरे हे शेतात गेल्याचे पाहुन दुपारी अडीच वाजता चोरांनी कंपाऊडवरून आत शिरुन मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. कपाटातील लाॕकरमधील सोन्याचे चपळाहार २५ ग्रॕॅम, नेकलेस १० ग्रॕॅम, आंगठी २ ग्रॕॅम, कानातले ६ ग्रॅम तसेच नगदी रक्कम ५४ हजार रुपये लंपास केली.
--
दुसऱ्या घटनेत चोरांनी अशी लढविली शक्कल
बालाजी प्लाॕॅट येथील दुपारी दीड वाजताच्या घटनेत वासुदेव जायले हे पती-पत्नी शिक्षक असल्याने शाळेत गेले आणि मुलगा कामानिमीत्त बाहेर गेल्याचे हेरून चोरांनी घराचा मुख्य दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. लोंखडी आलमारीतील १०० ग्रॕॅमच्या २ पाटल्या, ४० ग्रॕॅमचे मंगळसूत्र व नगदी ५ हजार रुपये असा अंदाजे २ लक्ष ८५ हजार रुपयाचा माल लंपास केला.
-----------