अंजनगाव पालिकेत ४५ लाखांचा मालमत्ता मूल्यमापन घोटाळा ?
By Admin | Updated: November 17, 2014 22:44 IST2014-11-17T22:44:43+5:302014-11-17T22:44:43+5:30
पालिकेच्या मालमत्तांचे कर मूल्यमापन करताना अमरावती येथील स्थापत्य कन्सलटन्सी नामक एका कागदोपत्री संस्थेने पालिकेच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संगनमत करून

अंजनगाव पालिकेत ४५ लाखांचा मालमत्ता मूल्यमापन घोटाळा ?
कारवाईची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
अंजनगाव सुर्जी : पालिकेच्या मालमत्तांचे कर मूल्यमापन करताना अमरावती येथील स्थापत्य कन्सलटन्सी नामक एका कागदोपत्री संस्थेने पालिकेच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संगनमत करून ४५ लाख रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप नगरसेवक नीलेश पसारी यांनी केला आहे. याबाबतची लेखी तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून १८ नोव्हेंबर रोजी पंसारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी पाचारण केले आहे.
अंजनगाव पालिकेच्या कार्यक्षेत्रात मालमत्तेसंबंधी जमिनी व इमारतींचे कर मूल्यनिर्धारण, स्थळ सर्वेक्षणे, मालमत्तांचे संगणीकृत नकाशे, डिजिटल कलर फोटो काढून संगणक प्रणालीला जोडणे इत्यादींबाबत निविदा काढून योग्य त्या कंपनीस कंत्राट द्यावयाचे होते. परंतु तत्कालीन नगराध्यक्ष आदेश बोबडे व पदाधिकाऱ्यांनी निविदा प्रचलित वृत्तपत्रांना न देता एका कमी खपाच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केली. त्यांनी संगनमत करून एकाच ठिकाणच्या तीन बोगस आणि एकमेकांसोबत संलग्न असणाऱ्या तीन आस्थापनांकडून निविदा घेतल्या. त्यातीलच स्थापत्य कन्सलटन्सी नामक एका संस्थेसोबत करारनामा करून कर मूल्यनिर्धारणाचे कंत्राट प्रति मालमत्ता ३६७ रूपयेप्रमाणे दिल्याचा आरोप नगरसेवक नीलेश पंसारी यांनी केला आहे.