अंजनगावला वादळी पावसाचा तडाखा
By Admin | Updated: June 26, 2016 00:02 IST2016-06-26T00:02:42+5:302016-06-26T00:02:42+5:30
शहरात शुक्रवारी रात्री ९ ते ९.३० वाजतादरम्यान अचानक वादळासह विजेचा कडकडाट झाला. पावसामुळे या भागातील घरे, शाळा, दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अंजनगावला वादळी पावसाचा तडाखा
शेकडो घरांची पडझड, झाडे उन्मळली : अकोट-परतवाडा मार्गावरील वाहतूक ठप्प
अंजनगाव सुर्जी : शहरात शुक्रवारी रात्री ९ ते ९.३० वाजतादरम्यान अचानक वादळासह विजेचा कडकडाट झाला. पावसामुळे या भागातील घरे, शाळा, दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चक्रीवादळाने शहरातील प्रत्येक नागरिक जीव मुठीत धरून घरात बसून होता.
अंजनगाव-अकोट मार्ग जाम झाल्यामुळे वाहनचालकांतसुध्दा चकमक उडाली. शहरातील गुलजारपुरा, यशनगर, दयानंद नगर, अंबानगर, शिवपार्वती नगर, हेंड प्लॉट, या भागातील झाडे घरावर कोसळले असून घरावरील छत, टिनपत्रे उडून २२गेली, त्यामुळे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले.
यशनगर शेजारील पंचफुलाबाई हरणे महाविद्यालयाचे व शाळेचे टिनाचे छत उडून गेले. त्यामुळे ऐन शाळेला सुरुवात होण्याच्या काहीच दिवसांपूर्वी हा भयंकर प्रसंग उद्भवल्यामुळे शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाची धांदल उडाली आहे. गुलजारपुरा येथील कराळे, रेखासुने, शहाबुद्दीन, नरेंद्र हेड, भगवान थोरात यांच्या घराचे फारमोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आ.रमेश बुंदिले शहराध्यक्ष मनोहर मुरकुटे, नायब तहसीलदार चव्हाण यांनी करून नुकसानग्रस्तांना मदतीच्या सूचना आ.रमेश बुंदिले यांनी दिल्यात. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचे लाखोंचे पीक जमीनदोस्त
अंजनगाव सुर्जी तालुका आधीच दरवर्षीच्या निसर्गाच्या अवकृपेने होरपळून निघत आले. सतत तीन वर्षांपासून शेतकरी संकटात सापडला आहे. दरवर्शी अस्मानी, सुल्तानी संकटाला या भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. असेच संकट शुक्रवारी रात्री अचानक ९ वाजतादरम्यान आल्याने वादळ व विजेच्या कडकडाटामुळे, खोडगाव, शेलगाव, तुरखेड, निमखेड, पांढरी या भागातील संत्रा, केळी, पानपिंपरी आदी पिके जमीनदोस्त झाली. या भागातील लाखो रुपये किमतीचे पीक हे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हा पूर्णपणे धास्तावून गेला आहे.