प्राण्यांचा छळ; अमर सर्कस कायमस्वरुपी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:42 IST2018-09-04T22:42:10+5:302018-09-04T22:42:46+5:30
राज्यभरात प्रसिद्ध अमर सर्कस पूर्णपणे बंद पडली असून, जनावरांवरील अत्याचारांची तक्रार वन्यप्रेंंमी मंगळवारी कोतवाली पोलिसात नोंदविली. पोलिसांनी पक्षी व प्राण्यांना घेऊन जातानाच ट्रक पकडण्यात आला आहे.

प्राण्यांचा छळ; अमर सर्कस कायमस्वरुपी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यभरात प्रसिद्ध अमर सर्कस पूर्णपणे बंद पडली असून, जनावरांवरील अत्याचारांची तक्रार वन्यप्रेंंमी मंगळवारी कोतवाली पोलिसात नोंदविली. पोलिसांनी पक्षी व प्राण्यांना घेऊन जातानाच ट्रक पकडण्यात आला आहे.
सायंस्कोर मैदानात काही महिन्यांपूर्वी अमर सर्कस सुरू झाली होती. मात्र, काही महिन्यांतच जागेच्या भाड्याचा वाद पुढे आला. जिल्हा परिषदेच्या शाळा प्रशासनाकडून सर्कस संचालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हाही नोंदविण्यात आला. व्यवसायात तोटा आल्याने सर्कस बंद करण्यात आली. मात्र, सर्कशीत काम करणाऱ्या मनुष्य व प्राण्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. सोमवारी रात्री इंद्रप्रताप सुभाष ठाकरे (रा.साईनगर) यांच्यासह प्राणीप्रेंमीनी सायंस्कोर मैदानात जाऊन प्राण्यांची हिरीरीने पाहणी केली असता त्यांना विदारक चित्र दृष्टीस पडले. प्राणी उपाशी व काही प्राणी जखमी अवस्थेत आढळले. याबाबत त्यांनी रात्री कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी सर्कशीच्या व्यवस्थापकाला नोटीस बजावून प्राण्यांवर औषधोपचार करण्यास सुचविले. मात्र, यासंदर्भात पोलीस कारवाई न झाल्याचे पाहून मंगळवारी इंद्रप्रताप ठाकरे यांच्यासह काही वन्यप्रेमींनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांची भेट घेतली. सर्कसमध्ये प्राण्यांवरील अत्याचार व त्यांची दयनीय स्थिती सीपींसमोर मांडली. त्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेत पोलीस उपायुक्त निवा जैन यांना निर्देश देऊन कारवाई करण्यास सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाईसाठी पाऊल उचलले. तोपर्यंत सर्कसमधील प्राणी नागपूरला नेले जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी प्राणी घेऊन जाणाºया ट्रकला एसआरपीएफ कॅम्प परिसरात अडविले. त्यानंतर सर्व प्राण्यांंना पुन्हा सायंस्कोर मैदानात आणण्यात आले. त्यांची पशुधन विकास अधिकारी कुळकर्णी यांनी वैद्यकीय तपासणी केली. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तक्रारीच्या अनुषंगाने कोतवाली पोलिसांनी प्राण्यांना निर्दयी वागणूक प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(एच)(आर) नुसार गुन्हा नोंदविला.
मनेका गांधींनी साधला सीपींशी संवाद
अमरावतीमधील अमर सर्कशीतील प्राण्यांच्या दयनीय अवस्थेची माहिती स्थानिक प्राणी संस्थांना पीपल्स फॉर अॅनिमल संघटनेच्या प्रमुख ना. मनेका गांधी यांना दिली. या अनुषंगाने त्यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. वन्यप्राणीप्रेमी इंद्रप्रताप ठाकरे यांच्यासह सागर मैदानकर, शुभम सायंके आदींनी प्राण्यांवरील अत्याचाराला वाचा फोडली. या प्रकरणात ते पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या भेटीला गेले. त्यावेळी मेनका गांधी यांनी सीपींशी संवाद साधल्याचे इंद्रप्रताप ठाकरे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
जखमी उंट गेला कुठे?
सर्कशीत एका उंटाला मधुमेह झाला होता. त्याच्या पाठीवर मोठी जखम झाली होती. प्राण्यावर अत्याचार होत असल्याची तक्रार झाल्यानंतर सर्व प्राण्यांना नागपूरला हलविण्याची तयारी सुरू झाली. प्राण्यांना ट्रकमध्ये टाकून रवाना करण्यात आले. पोलिसांनी ट्रक पकडला. मात्र, त्यात जखमी उंट आढळला नाही. तो उंट कुठे गेला, याबाबत संशय व्यक्त होत आहे.
सर्कस चालविताना विविध अडचणींचा सामना करावा लागल्याने ती कायमस्वरुपी बंद केली. काही मनुष्यबळाला रोजगार आमच्याकडून दिला जात आहे. प्राण्यांना नागपूरला उपचारार्थ पाठविले जाईल.
- नीरज गाडगे, अमर सर्कसचे मालक