अन् जावयालाही काढाव्या लागल्या उठबशा
By Admin | Updated: March 7, 2017 00:23 IST2017-03-07T00:23:05+5:302017-03-07T00:23:05+5:30
चलपूर- परतवाडा शहर हागणदारीमुक्तीसाठी पालिका प्रशासनाने सक्त कारवाईला सुरुवात केली आहे.

अन् जावयालाही काढाव्या लागल्या उठबशा
गुडमॉर्निंग पथकाची कारवाई : उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर फौजदारी
परतवाडा : अचलपूर- परतवाडा शहर हागणदारीमुक्तीसाठी पालिका प्रशासनाने सक्त कारवाईला सुरुवात केली आहे. शुक्रवारी जुळ्या शहरातील काही भागात गूड मॉर्निंग पथकाने कारवाई केली. त्यात पाहुणा म्हणून आलेल्या जावयाला उठबशा काढाव्या लागल्याचा प्रकार घडला.
मार्च महिन्यापर्यंत परतवाडा - अचलपूर शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासन दिवसरात्र एक करीत आहे. प्रत्येक घरात शौचालय आणि सार्वजनिक शौचालयाची निर्मिती सुरू आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना दंड आकारीत फौजदारी कारवाई सुरू आहे. गुलाबपुष्प देत गांधीगिरीचा काही एक परिणाम शहरात झाला नाही. परिणामी पालिकेचे अधिकारी पहाटे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. शहरात दररोज पथक कारवाईकरीत असताना अनेक मजेशीर किस्से आता त्यातून बाहेर येऊ लागले आहे.
परतवाडा - अचलपूर शहरातील विविध भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध गुडमॉर्निंग पथकाच्या कारवाया सुरू आहेत. अशातच शुक्रवारी शहरातील विलायतपुरा भागात सासऱ्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या जावयाला उघड्यावर शौचास बसलेल्या अवस्थेत पथकाने पकडले. जावई पकडला गेला म्हणून त्या परिवाराला याची माहिती मिळताच साळा मदतीला आला. माझ्यावर कारवाई करा, मात्र जावई बापूला सोडा म्हणू लागला. पथकातील मुख्याधिकारी प्रदीप जगताप, अ.सत्तार आरोग्य निरीक्षक, उस्मान खान, मो. जहीर, संजय समुंद, शे. इरफान यांनी काही न ऐकता जावायालाही उठबशा काढायला लावल्यात. (तालुका प्रतिनिधी)
जावई बाप्पू अडकले
अनेकांची पळापळ
गुडमॉर्निंग पथक दिसताच शहरातील विशिष्ट भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची मोठी पंचाईत होत असल्याचे चित्र आहे. लोटा घेऊन गोदरीत जाताच पथक दिसत असल्याने तो लोटा घेऊन उघड्यावर बसणारे पळतानाचे चित्र अनेकांचे मनोरंजन करणारे ठरले आहे.