अन् आसमंतात विरल्या त्यांच्या किंकाळ्या !
By Admin | Updated: May 21, 2016 00:09 IST2016-05-21T00:09:23+5:302016-05-21T00:09:23+5:30
हसते खेळते कुटुंब....झोपडी असली तरी घरात गोकुळ नांदत असलेले. पती-पत्नी, दोन चिमुरडे आणि म्हातारी आजी. असे त्यांचे पंचकोनी कुटुंब.

अन् आसमंतात विरल्या त्यांच्या किंकाळ्या !
मदत मिळालीच नाही : मार्कंड्यातील वाघमारे कुटुंबाची राखरांगोळी
संदीप मानकर अमरावती
हसते खेळते कुटुंब....झोपडी असली तरी घरात गोकुळ नांदत असलेले. पती-पत्नी, दोन चिमुरडे आणि म्हातारी आजी. असे त्यांचे पंचकोनी कुटुंब. रोजच्या सारखाच दिवस उगवला. पण, काळाच्या मनात काही औरच होते. नेहमीप्रमाणे स्वयंपाक करून चिल्या-पिल्यांसह जेवण करावे आणि दुपारी वामकुक्षी घ्यावी, असा तिचा विचार असावा. पण, क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि अख्खे कुटुंब काळाचा घास ठरले.
तालुक्यातील मार्कंडा येथे घडलेल्या अग्निकांडाच्या खाणाखुणा अंगावर शहारे आणत होत्या. काडी-काडी करून जमवलेल्या संसाराच्या चिंधड्या उडाल्या होत्या. वस्तू सोडाच पण, काही वेळापूर्वी किलबिल करणारी चिमुकली अग्निच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करताना धडपडणारी ‘ती’ आई देखील कोळसा झाली होती. गावकरी हतप्रभ होऊन डोळ्यांसमोर घडलेला अग्निचा विनाश पाहात होते.
कर्ताही मृत्यूला शरण गेला!
अमरावती : अग्नीच्या विळख्यात कसाबसा तग धरून राहिलेला कुटुंंबातील कर्तादेखील काही तासांनी मृत्यूला शरण गेला.
तालुक्यातील हजार लोकवस्तीचे मार्कंडा गाव. गावातील दलित वस्ती. सध्या सूर्य कोपलाय. त्यामुळे लोक दुपारी घराबाहेर पडण्याचे टाळतात. शुक्रवारीदेखील असाच दिवस उगवला.
वाघमारे कुटुंबातील चंदाबाई गुरूवारी रात्रीच माहेरहून परतल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई कमलाबाईदेखील गेल्या होत्या. पण, त्या काही कारणास्तव तिथेच राहिल्या.
दुसऱ्या दिवशी चंदाबाई नेहमीप्रमाणे पहाटेची कामे आटोपून दुपारच्या जेवणाची तयारी करीत होत्या. झोपडीवजा लहानसे घर. ओसरीत चूल मांडलेली. मुले समृध्दी आणि सार्थक पिता नीलेशसह आतल्या खोलीत निजलेले. सगळे काही सुरळीत. चंदाबार्इंनी चूल पेटविली आणि कशी कोण जाणे, एक ठिणगी उडाली. घरातील वस्तुंनी बेमालूमपणे पेट घेतला. चंदाबाई कामात व्यग्र. काही काळ त्यांना कळलेच नाही. थोड्या वेळात घर धगधगू लागले.
शेजारचे लोकही उन्हामुळे आपापल्या घरात दडलेले. घर पेटल्याचे लक्षात येताच चंदाबाई सर्वप्रथम चिमुरड्यांना वाचविण्यासाठी आत धावल्या. मात्र, तोवर आग चांगलीच भडकली होती. क्षणात छतावरचे टीन खाली कोसळले आणि त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग अवरूद्ध झाला. तोवर मुलांना आणि पतीलाही जाग आलेली. आगीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठीचा त्यांचा आकांत सुरू. पण, उन्हापासून बचावासाठी घरात दडलेल्या गावकऱ्यांना काही कळलेच नाही.
दरम्यान शेजारच्या एका लहान मुलाला हा प्रकार लक्षात आला. त्याने आरडाओरडा केला. गावकरी गोळा झाले. पण, तोवर आगीने रौद्र रूप धारण केले होते. पेटत्या घरात शिरून कोणालाही बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे गावकरी हतबल होऊन पाहात राहिले. चार जिवांचा आकांत सुरूच होता. हळूहळू तो शांत झाला.
आगीची झळ आसपासच्या घरांना लागून अधिक हानी होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा पाईप आणून आणि मिळेल त्या साधनाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, तोवर तीन जिवांचा कोळसा झाला होता. तर आगीत भयंकररीत्या होरपळलेला कर्ता अंतिम घटका मोजत होता. गावकऱ्यांनी नीलेश याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तहसीलदार राहुल तायडे शनिवारी पाहणी करणार आहेत. (प्रतिनिधी)