अन् महापालिका शाळांच्या भिंतीही बोलक्या झाल्या....! नव्याने रंगरंगोटी : शिक्षण विभागाचा सकारात्मक पुढाकार
By प्रदीप भाकरे | Updated: July 16, 2023 16:47 IST2023-07-16T16:46:44+5:302023-07-16T16:47:09+5:30
प्रयत्नांतून महापालिका शाळांमधील भिंती बोलक्या होऊ लागल्या आहेेत.

अन् महापालिका शाळांच्या भिंतीही बोलक्या झाल्या....! नव्याने रंगरंगोटी : शिक्षण विभागाचा सकारात्मक पुढाकार
अमरावती: खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांकडे विदयाथ्यांचा कल वाढावा, पटसंख्या वाढावी, गरिब विद्याथ्यांना किमान मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका आयुक्त देविदास पवार व शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून महापालिका शाळांमधील भिंती बोलक्या होऊ लागल्या आहेेत.
विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहू नये आकर्षक चित्रकृती, अक्षर, गणितीय आकडेमोड, विज्ञानातील प्रयोग, महापुरुषांची नावे, सामान्यज्ञान इत्यादी बाबी रंगबेरंगी पद्धतीने रेखाटण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. १५ जुलै रोजी महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा शेगांव येथे वृक्षारोपण तथा शिक्षकांच्या स्वयंस्फूर्तीने शालेय रंगरंगोटी करण्यात आली. यावेळी आयुक्त देविदास पवार, सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे व शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम उपस्थित होते.
आयुक्तांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व सांगून ‘एक कुटूंब एक झाड़’ हा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. यावेळी माजी नगरसेवक विजय वानखडे, मनोज इंगळे उपस्थित होते.
मुलांनी काढली वृक्षदिंडी
शेगाव येथील महापालिका शाळेतील विद्याथ्यांनी यावेळी वृक्षदिंडी काढली. तथा वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित केले. यावेळी आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या ६५ शाळांमध्ये रंगोरंगोटी व तेथील भिंती बोलक्या केल्या जाणार आहे. या कार्यक्रमाला विशेष कार्य अधिकारी डॉ. सीमा नैताम, सहायक आयुक्त भुषण पुसतकर, शाळा निरिक्षक उमेश गोदे व प्रवीण ठाकरे, मुख्याध्यापिका संगिता कुकडे व शिक्षकवर्ग उपस्थित होता. संचालन शिक्षिका मीना हटवार यांनी केले.