अन् ‘ती’ दहा जणांना घेऊन आली पोलीस बंदोबस्तात नेले सहा जणांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:01 IST2021-12-09T05:00:00+5:302021-12-09T05:01:03+5:30
६ नोव्हेंबरपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. राज्यभरातील अनेक बसगाड्यांची चाके थांबली आहेत. गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचे प्रवासाचे सुरळीत मार्ग पूर्णतः बंद झाले आहे अशात बुधवारी ४:१५ वाजता अमरावती आगाराचे एम एच १३ क्यू ६७०७ क्रमांकाची बस अमरावतीहून दहा प्रवाशांना घेऊन आली आणि ४:३० वाजता सहा प्रवासी सोबत घेऊन गेली. आगारात कुठल्याच प्रकारे अडचण येऊ नये, यासाठी स्वतः विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे व अधिकारी उपस्थित होते.

अन् ‘ती’ दहा जणांना घेऊन आली पोलीस बंदोबस्तात नेले सहा जणांना
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मागील ३० दिवसांपासून गावागावांतील सर्वसामान्य, गोरगरीब नागरिक तिची चातकासारखी वाट पाहत आहेत. मात्र, ती रुसली आहे. अचानक आपल्या मागण्यांसाठी राग धरून बसली आहे. समजूत घालणे सुरू आहे. अशातच बुधवारी सायंकाळी ४:१५ वाजता अचानक दहा जणांना घेऊन ती परतवाडा आगारात आली. तिच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जाताना सहा जणांना सोबत घेऊन गेली
६ नोव्हेंबरपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. राज्यभरातील अनेक बसगाड्यांची चाके थांबली आहेत. गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचे प्रवासाचे सुरळीत मार्ग पूर्णतः बंद झाले आहे अशात बुधवारी ४:१५ वाजता अमरावती आगाराचे एम एच १३ क्यू ६७०७ क्रमांकाची बस अमरावतीहून दहा प्रवाशांना घेऊन आली आणि ४:३० वाजता सहा प्रवासी सोबत घेऊन गेली. आगारात कुठल्याच प्रकारे अडचण येऊ नये, यासाठी स्वतः विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे व अधिकारी उपस्थित होते.
परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन भालेराव, कर्मचारी सुदर्शन झोड, शेख नाजीम, नितीन कळमाटे आदी उपस्थित होते. चांदूरबाजार नाक्यापर्यंत पोलीस बंदोबस्तात एसटी बस सोडण्यात आली.
जिल्ह्यात २२ बस गाड्या सुरू
अमरावती येथून जिल्ह्यातील विविध भागात २२ गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना कुठल्याच प्रकारे त्रास होऊ नये, यासाठी एसटी महामंडळ देखरेख करीत असून कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांकडून या बस गाड्या चालविल्या जात आहेत.
बघ्यांची गर्दी
परतवाडा आगारातून महिनाभरानंतर अमरावती येथून बस आल्याने मुख्य मार्गावर ये-जा करणाऱ्यांनी बस पाहण्यासाठीसुद्धा गर्दी केली होती. सुरक्षितरीत्या आलेली बस प्रवाशांना घेऊन सुरक्षित गेली.
अमरावती ते परतवाडा बसफेरी बुधवारी नेण्यात आली. पोलिसांचा बंदोबस्त होता. जिल्ह्यात एकूण २२ बस गाड्या सुरू झाल्या आहेत.
- श्रीकांत गभणे,
विभागीय नियंत्रक, अमरावती