...आणि गहिवरले लक्षावधी गुरूदेवभक्त!
By Admin | Updated: October 21, 2016 00:14 IST2016-10-21T00:14:25+5:302016-10-21T00:14:25+5:30
‘पाहिले का गुरूकुंज। तुम्ही आजवरी, अभ्याग्यासी भाग्य लाभे, जाता तोवरी हो।’

...आणि गहिवरले लक्षावधी गुरूदेवभक्त!
निरव शांतता, पाणावलेले डोळे : स्वयंशिस्तीत राष्ट्रसंतांना श्रद्धांजली
अमरावती : ‘पाहिले का गुरूकुंज। तुम्ही आजवरी,
अभ्याग्यासी भाग्य लाभे, जाता तोवरी हो।’ राष्ट्रसंतांच्या या संदेशाला अनुसरून गुरूकुंजात डेरेदाखल झालेल्या लक्षावधी भक्तांनी गुरूवारी सायंकाळी ४.५८ मिनिटांनी राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, पालख्या, दिंडी, पताक्यासह वाजत-गाजत, खंजेरीच्या नादात ‘श्रीगुरुदेव की जय हो’ असा जयघोष करीत टाळ, मृदंगांच्या गजरात भगव्या टोप्या परिधान करून मौन श्रद्धांजलीसाठी लाखो भाविक तीन दिवस आधीपासूनच गुरूकुंजात डेरेदाखल झाले होते.
मौन श्रद्धांजलीपूर्वी राष्ट्रसंतांच्या विश्वव्यापक कार्याची महती शब्द व सुरांच्या माध्यमातून उपस्थित जनसमुदायाला करून दिली गेली. राष्ट्रसंतांच्या विचारांची व कार्याची मशाल सतत प्रज्ज्वलीत ठेवण्याच्या उद्देशाने आणि सत्कार्याची प्रेरणा देणारा हा मौन श्रद्धांजलीचा भावोत्कट कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने गुरूवारी पार पडला.
मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला बुधवारी ३.३० वाजता ‘गुरूदेव हमारा प्यारा’ या प्रार्थनागीताने सुरूवात झाली. तब्बल तीन तास लाखोंचा जनसमुदाय राष्ट्रसंतांचे विश्वात्मक विचार व त्यांच्या कार्याच्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसला होता. घड्याळात काटा ४.५८ मिनिटांवर स्थिरावताच पंचक्रोशीत निरव शांतता पसरली आणि लाखो गुरूदेवभक्तांनी आपापल्या स्थानावरूनच महासमाधीच्या दिशेने हात जोडून राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहिली. नकळत लक्षावधी डोळे पाणावले.
कार्यक्रमात ‘सेवामंडल मेरी साधना है, सेवामंडल मानवता का धाम है, सेवामंडल मेरे विचारोंके तत्वका सार है, ही सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.