अन् अनुप ठरला ‘मृत्युंजय’

By Admin | Updated: March 11, 2017 00:01 IST2017-03-11T00:01:50+5:302017-03-11T00:01:50+5:30

सुस्वभावी, मितभाषी, मनमिळावू अनुपवर मृत्युने अकाली झडप घातली. मात्र, मूत्रपिंड व यकृतदान केल्याने अनुप एकाअर्थाने मृत्युंजयच ठरलाय.

And it was not possible to 'die' | अन् अनुप ठरला ‘मृत्युंजय’

अन् अनुप ठरला ‘मृत्युंजय’

गायकवाड कुटुंबाचा आदर्श : किडनी, यकृत दान करून तिघांना जीवदान
अमरावती : सुस्वभावी, मितभाषी, मनमिळावू अनुपवर मृत्युने अकाली झडप घातली. मात्र, मूत्रपिंड व यकृतदान केल्याने अनुप एकाअर्थाने मृत्युंजयच ठरलाय. मूत्रपिंड आणि यकृताचे गरजू रूग्णांवर प्रत्यारोपण करून तिघांना नवजीवन दिले आहे. शिवाय अंबानगरीत प्रथमच अवयवदानासाठी पुढाकार घेऊन मध्यमवर्गीय गायकवाड कुटुंबाने समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे.
तीस वर्षीय अनुप गायकवाड याला ‘ब्रेन हॅमरेज’ झाले. रेडिएंट हॉस्पिटलमध्ये त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र, तरीही अनुपची प्रकृती सुधारली नाही. त्याच्या मेंदुचे कार्य बंद पडले. त्याला डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ घोषित केले. दोन मुलींच्या पाठचा एकुलता एक मुलगा असलेल्या अनुपची अशी अवस्था पाहून गायकवाड कुटुंबिय पार हादरून गेले. मध्यमवर्गिय कुटुंबात जन्मला असला तरी अनुप आई-वडिल आणि दोन्ही बहिणींचा अतिशय लाडका.
आई गृहिणी, वडिल विदर्भ आयुर्वेद औषधी शाळेत नोकरीला तर दोनपैकी एक बहिण विवाहित. अशा सुखी-समाधानी कुटुंबात अनुप लहानाचा मोठा झाला. सदैव शांत, हसरा चेहरा आणि मितभाषीपणा ही अनुपच्या स्वभावाची वैशिष्ट्ये. त्याने नुकतीच आयटीआयमध्ये वायरमन ट्रेडची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी तो उत्तीर्ण झाला. नोकरीच्या शोधार्थ तो धडपडत होता. नोकरी मिळेपर्यंत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने ‘पार्ट टाईम’ नोकरी सुरू केली होती.

‘त्या’ रुपात अनुप जिवंतच
अमरावती : गायकवाड कुटुंबाची सुखी-समाधानी वाटचाल नियतीला मंजूर नव्हती. काही दिवसांपूर्वी अनुप आजारी पडला. सर्दी, डोकेदुखी व तापाने तो हैराण झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने औषधोपचार सुरू केलेत. मात्र, त्याचा त्रास कमी होत नव्हता. दरम्यान त्याची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्याला येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी अनुपवर शर्थीने उपचार केलेत. मात्र, तरीही त्याची प्रकृती सुधारली नाही. त्याला कृत्रिम जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित केले.
गायकवाड कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबाचे भविष्य असलेला एकुलता एक मुलगा मृत्युशय्येवर असताना कोणते आई-वडील धीर धरू शकतील? मात्र, त्याही स्थितीत अनुपचे वडील ईश्वर गायकवाड यांनी सामाजिक जाण ठेवून अनुपचे अवयव दान करण्याची इच्छा रूग्णालयातील डॉक्टरांसमोर व्यक्त केली. डॉक्टरांनी गायकवाड कुटुंबाच्या या निर्णयाचा आदर करीत तातडीने मुंबईतील डॉक्टरांशी संपर्क केला आणि लगोलग अवयवदानाची पुढील प्रक्रिया राबविली. शस्त्रक्रियेद्वारे अनुपचे मूत्रपिंड आणि यकृत काढण्यात आले. पुरेशा देखरेखीत दोन्ही अवयव मुंबई आणि नागपूरकडे रवाना झाले. तेथे ते गरजू रूग्णांवर प्रत्यारोेपित केले जातील. आपल्या मुलाच्या अवयवांमुळे मृत्युच्या दाढेत असलेल्या तिघांना जीवदान मिळेल आणि त्या रूग्णांच्या रूपाने अनुप जीवंत राहिल, असा विश्वास अनुपच्या माता-पित्यांना आहे.
शस्त्रक्रियेनंतर गुरूवारी अनुपची कृत्रिम जीवनरक्षक प्रणाली काढण्यात आली. अनूप कायमचा निद्रिस्त झाला. त्याच्या पालकांनी मोठ्या कष्टाने रोखून ठेवलेले अश्रू ओघळू लागले. त्याच्या बहिणी आणि आईने हंबरडा फोडला. नातलगांना शोक अनावर झाला. रूग्णालयात नातेवाईकांसह आप्तेष्ट आणि मित्रांची चिकार गर्दी उसळली. अवघ्या तिशीत मृत्युला कवटाळणाऱ्या अनुपच्या आठवणींची प्रत्येकाच्या मनात गर्दी झाली होती. मात्र, अवयवदानातून अनुप सदैव जीवंत राहिल, हे समाधान त्याच्या आप्तेष्टांच्या चेहऱ्यावर दिसत होते. (प्रतिनिधी)

या डॉक्टरांनी घेतले परिश्रम
स्थानिक खासगी रूग्णालयात अवयवदानासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे या रूग्णालयाला शासनाकडून परवानगी मिळाली. त्यामुळेच पुढील प्रक्रिया तातडीने राबविली गेली. शस्त्रक्रियेद्वारे अवयव काढताना अनूपच्या शरीराचे तापमान गरजेनुसार ‘मेंटेन’ ठेवले गेले. रक्तदाब व हृदयाच्या ठोक्यांनासुद्धा नियंत्रित करण्यात आले. सुंगणीतज्ज्ञ महेंद्र चव्हाण यांनी डोळ्यांत तेल घालून लक्ष दिले. याशिवाय न्युरो फिजिशियन सिकंदर अडवाणी, न्युरोसर्जन आनंद काकाणी, पवन अग्रवाल, अनुराधा काकाणी, प्रशांत मुळावकर, संदानद भुसारी, प्रशांत खेतान, धनंजय बिकारे, संजय कोलते, निखिल बडनेरकर, सीमा अडवाणी, माधुरी अग्रवाल, प्रशांत खोब्रागडे, हर्षाली लखतरिया, प्रीती बैस, सागर धनोडकर यांनी प्रयत्न केलेत.

ग्रीन कॉरिडोअरमार्फत वाहतूक सुरळीत
अनुप गायकवाडचे अवयव मुंबई व नागपूरपर्यंत सहा तासांच्या आत पोहोचविणे शक्य झाल्यासच त्याचे गरजू रूग्णांवर प्रत्यारोपण होऊ शकले असते. त्यामुळे हे अवयव विमानतळासह नागपूरला पोहोचविण्याची जबाबदारी कार्डिअ‍ॅक रूग्णवाहिकेवर होती.याकरिता ‘ग्रीन कॉरिडोअर’मार्फत वाहतूक नियंत्रित करण्यात आली. ‘झोनल ट्रान्सप्लांट कमिटी’चे रवि वानखडे यांचा ‘एसएमएस’ पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांना प्राप्त झाला होता. त्यानुसार त्यांनी वाहतुकीचा अडथळा दूर केला. वाहतूक शाखेचे निरीक्षक ठोसरे, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, शंकर बावनकुळे व नीलेश किल्लेकर यांनी धुरा सांभाळली.

गायकवाड कुटुंबाचे अनेकांनी केले सांत्वन
अनेक राजकीय नेत्यांनी रूग्णालयाला भेट देऊन गायकवाड कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्या सामाजिक जाणिवेबद्दल त्यांची पाठही थोपटली. नंदू हरणे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. अविनाश मार्डीकर, उपमहापौर संध्या टिकले, उपगटनेता विवेक कलोती, नीलेश विघ्ने यांनी सहकार्य केले.

कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्बुलन्सची महत्त्वाची भूमिका
मुंबई येथील किडनीतज्ज्ञांची चमू शस्त्रक्रियेकरिता ‘चार्टर्ड प्लेन’द्वारे शुक्रवारी सकाळी ९ वाजता बेलोरा विमानतळावर पोहाचली. तेथून सुनील शर्मा यांच्या कार्डिअ‍ॅक अम्बुलन्सद्वारे रूग्णालयात आणण्यात आले. तेथून लिव्हर घेऊन १२.५७ मिनिटांनी निघालेली रूग्णवाहिका १७ मिनिटात बेलोरा विमानतळावर पोहोचली.

अतिक्रमण निर्मूलन पथकाचा सहभाग
अवयव घेऊन निघालेल्या रूग्णवाहिका बेलोरा व नागपूरमार्गापर्यंत विनाअडथळा पोहोचाव्यात, अतिक्रमणाचा अडथळा होऊ नये, यासाठी मनपा अतिक्रमण निर्मुलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे लक्ष ठेऊन होते. त्यांनी मार्गावरील अतिक्रमण पाहणी करून तत्काळ हटविले.

Web Title: And it was not possible to 'die'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.