अन् शुक्रवारी डाळ बाजारात पोहोचली
By Admin | Updated: October 22, 2016 00:06 IST2016-10-22T00:06:54+5:302016-10-22T00:06:54+5:30
आठवडाभरापासून बाजारपेठेत डाळ उपलब्ध नसल्याने अचानक डाळीचे दर गगनाला भिडले होते.

अन् शुक्रवारी डाळ बाजारात पोहोचली
‘कोल्डस्टोरेज’ सील : साठेबाजांच्या ‘महसूल’ने आवळल्या मुसक्या
अमरावती : आठवडाभरापासून बाजारपेठेत डाळ उपलब्ध नसल्याने अचानक डाळीचे दर गगनाला भिडले होते. सामान्यांना डाळ खरेदी करणे शक्य नव्हते. मात्र डाळीची साठेबाजी रोखण्यासाठी महसूल विभागाने गुरूवारी रात्री अचानक ‘दालमिल’वर राबविलेल्या धाडसत्रानंतर शुक्रवारी बाजारपेठेत डाळीचा मुबलकसाठा पोहचला, हे विशेष.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार ‘महसूल’च्या चमुने एमआयडीसीतील १२ तर दाभा व लोणी येथील दालमिलवर धाडसत्र राबविले. त्यानुसार ११ ठिकाणी परवान्यापेक्षा अधिक डाळीचा साठा असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. गुरूवारी रात्री तब्बल चार ते पाच तास चाललेल्या महसूलच्या ‘सर्चिंग आॅपरेशन’नंतर शुक्रवारी बाजारात डाळीचा साठा उपलब्ध झाल्याचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एमआयडीसीतील विष्णू मालपाणी यांच्या मालकीच्या ‘उद्घव पल्सेस कोल्डस्टोरेज’मध्ये चक्क डाळ साठवून ठेवल्याचे पाहून दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी सुद्धा अवाक झालेत. धाडसत्रादरम्यान १४ दालमिलची तपासणी करताना तीन मिलला परवाने नसल्याची बाब निदर्शनास आली. परवानगीपेक्षा अधिक आढळलेल्या डाळीच्या साठ्याचे बाजारमूल्य तीन कोटींच्या घरात असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. तहसीलदार सुरेश बगळे यांनी साठेबाजांच्या कारवाईला मूर्त रुप दिले. दालमिलवरील धाडसत्रानंतर स्टॉक तपासला असता अधिक साठा आढळून आला.
धाडसत्रादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त
अमरावती : १९२९.५ क्विंटल चनाडाळ जप्त केली. दालमिलच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी गित्ते स्वत: घटनास्थळी पोहोचले. साठेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या चमूला पाचारण केले होते. एमआयडीसीत एकाच वेळी चार ते पाच ठिकाणी दालमिलवर धाडसत्र राबविताना नेमके काय सुरू आहे, हे व्यापाऱ्यांना कळू शकले नाही. नायब तहसीलदार, अन्न व पुरवठा विभागाच्या निरीक्षकांनी पंचनामा करून डाळ ताब्यात घेतली. शुक्रवारी उशिरा डाळसाठ्याची मोजदाद सुरूच होती. गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दालमिलवर धाडसत्र राबविले.
‘आॅपरेशन साठेबाजी’साठी पाच तहसीलदार मैदानात
ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करण्याची व्यापाऱ्यांनी लढविलेली शक्कल हाणून पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार तहसीलदार मैदानात उतरले होते. सुरेश बगळे, वैष्णव वाहुरवाघ, राम लंके मनोज डोणारकर, पुरूषोत्तम भुसारी या पाच तहसीलदारांनी ‘आॅपरेशन साठेबाजी’ ही मोहीम फत्ते केली. त्यांच्या मदतीला जिल्हा अन्न व पुरवठा अधिकारी देवराव वानखडे, केशव मळसने, धीरज मांजरे, प्रशांत अडचुले, मंडळ अधिकारी संजय ढोक, वाय.एम. चतूर, मधुकर धुळे, डी.जी. गावनेर, प्रवीण वैद्य, तलाठी धर्माळे, भूषण डहाके, संतोष चपटे आदी होते.
दालमिलचे २०० पेक्षा अधिक परवाने?
अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या बघता दालमिलचे परवाने हे २०० पेक्षा अधिक असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली. अन्न व पुरवठा विभागाने कोणत्या आधारावर ही परवानगी दिली, याचा कसून शोध घेतला जाईल. आवश्यकतेक्षा जास्त डाळी तयार करणाऱ्या मिलला परवानगी कशी देण्यात आली, याचा शोधही महसूल विभागाद्वारे घेतला जाणार आहे.
साठेबाजी करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई केली जाईल. यात कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही. तीन कोटी बाजारमूल्याचा डाळीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
- किरण गित्ते,
जिल्हाधिकारी, अमरावती.