अन् शेतकऱ्याने गुरांपुढे टाकली वांगी
By Admin | Updated: September 7, 2016 00:11 IST2016-09-07T00:11:36+5:302016-09-07T00:11:36+5:30
अधिक उत्पादन व मागणी घटल्याने लाखो रूपये खर्च करूनसुद्धा मातीमोल भाव मिळत असल्यामुळे...

अन् शेतकऱ्याने गुरांपुढे टाकली वांगी
!बळीराजा संकटात : लाखोंचा खर्च अन् कवडीचा दर
नरेंद्र जावरे परतवाडा
अधिक उत्पादन व मागणी घटल्याने लाखो रूपये खर्च करूनसुद्धा मातीमोल भाव मिळत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने वांगी चक्क गुरांपुढे टाकून त्यांचा चारा केला.हा प्रकार नजीकच्या टवलार येथे मंगळवारी घडला.
पथ्रोट, टवलार, शिंदी आदी परिसरात सर्वाधिक प्रमाणात हिरव्या वांगींचे उत्पादन घेतले जाते. मात्र, पेरणी जास्त झाल्याने उत्पादनात कमालीची वाढ झाली व दर मातीमोल झाले. टवलार येथील पवन पातोंड, प्रशांत मामनकर, चेतन नागे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही वांगीची पेरणी केली. शेतातील इतर पिकांचा खर्च, फवारणी, निंदण, तोडणीचा खर्च वजा जाता काही पैसे शिल्लक राहण्याचे गणित त्यांनी वांगी पिकाच्या आधारे मांडले होते. अधिक उत्पादनासाठी पाहिजे त्याप्रमाणात मेहनतसुद्धा घेतली. मात्र अल्प दरामुळे त्यांची निराशा झाली. शेतकऱ्यांना वांगी अक्षरश: गुरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे.
कांदे, टोमॅटोनंतर वांगी
अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात ओलिताची सोय आहे. जवळपास चार प्रकल्प असल्याने मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येथे बागायतदार शेतकरी पालेभाज्यांचे उत्पादन घेतात. यापूर्वीच भाव न मिळाल्याने कांदा आणि टोमॅटो गुरांना टाकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. आता वांग्याची ही स्थिती झाल्याने पेरावे काय, असा सवाल त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
आंध्रप्रदेशासह सर्वदूर मागणी
‘सिजटा’ कंपनीच्या हिरव्या वांग्याला बंगळूरू, हैद्राबाद, करीमनगर, चंद्रपूर, नागपूर आदी बड्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परतवाडा येथून दररोज किमान दहा ट्रक वांगी विविध ठिकाणी पाठविली जातात. मात्र, उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
रुपया किलोनेही मागणी नाही
हिरव्या वांगीचे उत्पादन अधिक झाल्याने नेहमीप्रमाणे बाजारात त्याचे मूल्य घसरले. तोडणी, फवारणीचा खर्च निघावा म्हणून तोडलेली वांगी रुपया किलोनेसुद्धा कुणी घ्यायला तयार नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी गुरांपुढे मांडून संताप व्यक्त केला.