अन् त्याने मृत्यूनंतरही जपली सामाजिक बांधिलकी
By Admin | Updated: November 11, 2015 00:09 IST2015-11-11T00:09:19+5:302015-11-11T00:09:19+5:30
दहशतवाद्यांशी चार हात करताना कायमचे पंगुत्व आलेल्या एका माजी सैनिकाने मृत्यूनंतही सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

अन् त्याने मृत्यूनंतरही जपली सामाजिक बांधिलकी
माजी सैनिकाचे देहदान : समाजासमोर ठेवला आदर्श
प्रदीप भाकरे अमरावती
दहशतवाद्यांशी चार हात करताना कायमचे पंगुत्व आलेल्या एका माजी सैनिकाने मृत्यूनंतही सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अपंगत्वातही २० वर्षे लढत-झगडत या माजी सैनिकाने सोमवारी कामठी येथील खासगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांच्याच इच्छेनुसार स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले. नांदगावपेठच्या विनायक कांबळे (४८) या माजी सैनिकाने मृत्यूनंतरही देहदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञता व्यक्त केली.
मंगळवारी सकाळी १० वाजता कांबळे यांचा मृतदेह पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.
१९९५ मधील ‘तो’ दिवस
नांदगावपेठ येथील रहिवासी विनायक कांबळे १९८८ मध्ये सैन्यात दाखल झाले. पंजाब, अंदमान, निकोबार येथे सेवा दिल्यानंतर १९९५ मध्ये त्यांना मणीपूर इम्फाल येथे पोस्टींग मिळाली. इम्फालचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल यूपीएस समिवाल यांचे अंगरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडीत असताना २१ जुलै १९९५ मध्ये तो काळा दिवस उगवला. त्या सुमारास इंफालमध्ये उग्रवाद्यांनी हैदोस माजवला होता. कर्नल समिवाल यांच्या ताफ्यासोबत जात असताना बाजाराच्या मुख्य चौकात एका दिशेने समिवाल यांच्या दिशेने गोळीबार सुरू झाला. त्यांची गाडी पुढे निघावी, यासाठी कांबळे व त्यांचे अन्य सहकारी पुढे सरसावले. या हल्ल्यात दोन गोळ्या कमरेमध्ये व एक गोळी शोल्डरमध्ये शिरल्याने विनायक कांबळे रक्तबंबाळ झालेत. हल्ला सुरूच असल्याने उपचारास विलंब झाला. तब्बल सहा वर्षे कांबळे यांना रुग्णालयात काढावी लागली. एक गोळी मणक्यात अडकल्याने त्यांना उपचारांची गरज होती. हेलिकॉप्टरने त्यांना कलकत्याला पाठविण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांच्या कमरेखालचा भाग पूर्णत: अनियंत्रित झाला. सहा वर्षे रुग्णालयात काढल्यानंतर कायमचे पंगुत्व घेऊन ते २००१ च्या सुमारास नांदगावपेठला पोहचले. याही परिस्थितीत त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवले.
गावकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
हसतमुख असणाऱ्या अविवाहित माजी सैनिकाने शेवटचा श्वास घेतल्याची वार्ता नांदगावपेठमध्ये पोहोचताच अनेकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. पीडीएमसीमध्येही शेकडो जणांनी देहदान करणाऱ्या विनायक कांबळे यांच्या जगण्याच्या धडपडीला ‘सॅल्युट’ केला.