लासूरच्या आनंदेश्वर मंदिरालगत खोदकामात सापडल्या देवतांच्या प्राचीन मूर्ती

By Admin | Updated: September 21, 2015 00:08 IST2015-09-21T00:08:11+5:302015-09-21T00:08:11+5:30

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात लासूर येथे यादवकालीन ८०० वर्षांपूर्वीच्या आनंदेश्वर मंदिराच्या मागील भागात खोदकामादरम्यान शनिवारी ४ देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत

Ancient idols of gods found in Khodakam in the temple of Anandeshwar in Lasur | लासूरच्या आनंदेश्वर मंदिरालगत खोदकामात सापडल्या देवतांच्या प्राचीन मूर्ती

लासूरच्या आनंदेश्वर मंदिरालगत खोदकामात सापडल्या देवतांच्या प्राचीन मूर्ती

पुरातत्त्व विभाग करणार पाहणी : यादवकालिन ८०० वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी मंदिर
संदीप मानकर दर्यापूर
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात लासूर येथे यादवकालीन ८०० वर्षांपूर्वीच्या आनंदेश्वर मंदिराच्या मागील भागात खोदकामादरम्यान शनिवारी ४ देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. काळ्या पाषाणावर कोरीव व सुबक अशा या मूर्ती सध्या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सोमवारनंतर याची पाहणी करणार आहे. या मूर्तींमुळे प्रख्यात आनंदेश्वर मंदिराच्या प्राचीन इतिहासाची आणखी काही पाने उलगडणार आहेत.
दर्यापूर येथील लासूर येथे काळ्या पाषाणाचे अभेद्य किल्यासारखे दिसणारे ८०० वर्षांपूर्वीचे महादेवाचे मंदिर व प्राचीन शिवलिंग याठिकाणी आहे. सध्या मंदिराचा जीर्णोद्धार पुरातत्त्व विभाग नागपूरअंतर्गत करण्यात येत आहे. मंदिरालगत पूर संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. यासाठी खोदकाम सुरू असताना देवदेवतांच्या ४ मूर्ती आढळून आल्यात. याठिकाणी मंदिराच्या बांधणीच्या वेळेस जो काळा पाषाण दगड वापरण्यात आला त्याच पद्धतीच्या काळ्या पाषाणावर कोरीव अशा मूर्ती आहेत. त्या ४ मूर्तींपैकी ३ मूर्ती बजरंगबली व १ मूर्ती राधाकृष्णांची आहे. लासूर हे गाव पूर्णा, चंद्रभागा, काटेपूर्णा नदीचा त्रिवेणी संगम असलेल्या सांगवामेळ गावापासून जवळच आहे. पूर्णा नदीच्या तिरावर वसलेले लासूर हे गाव आनंदेश्वर मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाते. अमरावती येथील आझाद हिंद मंडळाने यंदा आनंदेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारल्यामुळे लासूरचे मंदिर चर्चेत आहे. यादवकालीन राज्यामध्ये हेमाडपंथी धाटणीचे हे मंदिर बांधण्यात आल्याचा इतिहास आहे. मंदिरामध्ये देवदेवतांच्या मूर्ती व कोरीव हस्तकलेचा खास नमुना याठिकाणी पहावयास मिळतो. देशभरातून पर्यटक व लेण्याचे अभ्यासक याठिकाणी भेट देतात. श्रावणात याच ठिकाणी मोठी यात्रा भरते. पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर या मंदिराची आणखी माहिती व इतिहास उजेडात येणार आहे.

चार कोरीव मूर्ती आढळल्या
यादवकालीन राज्यात जेव्हा मंदिराची बांधणी करण्यात आली, त्यावेळी हत्तीच्या साह्याने याठिकाणी दगड आणून कोरीव काम करण्यात आले होते. सध्या मंदिराचे जीर्णोद्धाराकरिता खोदकाम होत असताना ५ ते ७ फुटांवर या ४ मूर्ती तसेच काही कोरीव दगड आढळले. यापूर्वी ब्रिटिश राजवटीत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आले असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.

पुरातन विभागाच्या मजुरांनी केले खोदकाम
पुरातन विभागाच्यावतीने मंदिराचे जीर्णोद्धार सुरू आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला खोदकाम होत आहे. गावातील मजूर रमेश दाळे, लखन आठवले, रवी खंडारे, सत्यपाल आठवले, जगतपाल आठवले हे खोदकाम करीत असताना त्यांना प्राचीन कोरीव मूर्ती आढळल्या.

आम्ही खोदकाम केले असता याठिकाणी ६ ते ७ फुटांवर देवदेवतांच्या कोरीव मूर्ती आढळल्या. यानंतर यासंदर्भाची माहिती गावातील सरपंच व पोलीस पाटलांना देण्यात आली व नंतर मूर्ती मंदिरात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
- रमेश डोळे, मजूर.

मंदिरात प्राचीन मूर्ती सापडल्याचे मला गावकऱ्यांनी सांगितले. सोमवारी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना, तज्ज्ञांना व प्राचार्यांकडून या मूर्तींविषयी माहिती देण्यात येईल.
- राहुल तायडे,
तहसीलदार.

Web Title: Ancient idols of gods found in Khodakam in the temple of Anandeshwar in Lasur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.