अमृत योजनेतून अमरावतीकरांना मिळणार सुरळीत पाणीपुरवठा
By Admin | Updated: October 17, 2016 00:12 IST2016-10-17T00:12:46+5:302016-10-17T00:12:46+5:30
अमृत योजनेचा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

अमृत योजनेतून अमरावतीकरांना मिळणार सुरळीत पाणीपुरवठा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण
अमरावती : अमृत योजनेचा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही योजना लोकार्पित करण्यात आली. यासंदर्भात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रपरिषदेतून ही माहिती दिली.
यावेळी महापालिका आयुक्त हेमंत पवार, महापौर रिना नंदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे, उपविभागीय अभियंता व्ही.एस.मस्करे, किशोर रघुवंशी यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. रविवारी मुख्यमंत्र्यांनी दहाही शहरांत अमृत योजनेच्या कार्याचा शुभारंभ केला असून ती माहिती व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दहा जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना दिली. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने अमृत योजना लाभदायी ठरणार आहे. अमरावती शहरातही ही योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दिली. ११४.३५ कोटींच्या या योजनेत केंद्र सरकार ५० टक्के निधी पुरविणार आहे. राज्य सरकार २५ टक्के व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून २५ टक्के खर्च केला जाणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना वाढीव पाणी मिळेल. शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होऊन नवीन विस्तारित भागातही पाणीपुरवठा केला जाईल, या उद्देशाने ही अमृत योजनात अमंलात आणली गेल्याचेही मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांना सांगितले. (प्रतिनिधी)