‘अमृत’कडून करारनाम्याला छेद !
By Admin | Updated: December 28, 2016 01:41 IST2016-12-28T01:41:43+5:302016-12-28T01:41:43+5:30
महापालिकेला १५७ सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ने करारनाम्याला छेद देत अटी व शर्र्तींचे वारंवार उल्लंघन चालविले.

‘अमृत’कडून करारनाम्याला छेद !
अटी-शर्तीचे वारंवार उल्लंघन : महापालिकेतील झारीतील शुक्राचार्य कोण?
अमरावती : महापालिकेला १५७ सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ने करारनाम्याला छेद देत अटी व शर्र्तींचे वारंवार उल्लंघन चालविले. मात्र मागील ११ महिन्यांपासून ‘अमृत’ला रेडकार्पेट दिल्या गेल्याने झारीतील शुक्राचार्य कोण? या साखळीतील घटक कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात मे २०१६ मध्ये ‘अमृत’ सुरक्षारक्षक पुरविणारी बहुउद्देशीय सर्व सेवा नागरिक सहकारी संस्थेशी करारनामा करण्यात आला. ‘जगदंबा’ ब्लॅकलिस्ट केल्यानंतर १ फेब्रुवारी ते ३१ जानेवारी २०१७ या एक वर्षासाठी हा करारनामा झाला. त्यानंतर १९ मे २०१६ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले. यातही तांत्रिक अडचण आहे. करारनामा कधीचा, वर्कआॅर्डर कधीची आणि प्रत्यक्षात कामाचा कालावधी काय, याबाबत कुठलीच एकवाक्यता नाही. कार्यारंभ आदेशापूर्वी काम सुरू करणारी ‘अमृत’ ही कदाचित एकमेव संस्था असावी. दरम्यान ५०० रुपयांच्या मुद्रांकावर केलेल्या करारनाम्यात तब्बल ३३ अटी-शर्तींचा समावेश आहे. प्रत्यक्षात ‘अमृत’कडून बहुतेक अटी-शर्तीचे उल्लंघन केले जात असताना उपायुक्त प्रशासनासह सामान्य प्रशासन विभागाने ‘अमृत’च्या बेजबाबदार कामाकडे दुर्लक्ष केले. सुरक्षा रक्षकाची अनियमित हजेरी, वाईट वागणूक, कामचुकारपणा, निष्काळजीपणा आढळल्यास कोणतेही कारण न देता कंत्राट मुदतीच्या आत संपुष्टात आणण्याचे अधिकार आयुक्तांना असतील, असे करारनाम्यात नमूद आहे. प्रत्यक्षात अमृतकडून होणारी सुरक्षारक्षकाची पिळवणूक, भविष्यनिर्वाह निधी आणि ईएसआयसीचा वेळेवर न केलेला भरणा आणि किमान वेतन कायद्यानुसार निश्चित केलेल्या वेतनाला फासलेला हरताळ, या बाबी प्रशासनाच्या लेखी अनियमितता नाहीत. ३३ पैकी ८ ते १० अटीशर्तीचे वारंवार उल्लंघन केले जात असताना ‘अमृत’ला अभय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात एका बड्या राजकीय नेत्याचा प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आरोपही या निमित्ताने होत आहे. या करारनाम्यात १५ टक्के सेवाकराचा कुठेही उल्लेख नाही. २६.६१ इपीएफचा उल्लेख असला तरी ही संपूर्ण रक्कम सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून कपात करून ‘अमृत’ संस्था स्वत:ची तुंबडी भरते आहे.
वर्कआॅर्डरची अवहेलना
उपायुक्त प्रशासन यांच्याकडून १९ मे २०१६ ला श्री अमृत सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या संस्थेला वर्कआॅर्डर देण्यात आला. करारनाम्याप्रमाणे सुरक्षा रक्षकांच्या वेतनासोबत त्यांचे सर्व शासकीय अंशदान भरण्यासाठी ‘अमृत’ला अदा करण्यात येते. सर्व शासकीय अंशदान भरल्याची चलान कार्यालयीन देयकासोबतच सादर करावी. त्याशिवाय नवीन देयके मंजूर करता येणार नाही. वर्कआॅर्डरमधील अटी शर्तीचे वारंवार उल्लंघन केले.
या अटींचे होते उल्लंघन
ओळखपत्रासह गणवेश व आवश्यक साहित्याशिवाय असणाऱ्या सुरक्षारक्षकांना सुरक्षाक समजण्यात येणार नाही, अशी अट आहे. मात्र बहुतेकांना गणवेश, मोजे, काठीची वानवा आहे. बहुतांश जणांना गणवेशच नाही.
अनेकदा अनेक सुरक्षा रक्षक रजेवर जाताना तेथे पर्यायी व्यवस्था करणे बंधनकारक आहे. ३०० रुपये दंड आकारण्याची अट आहे. मात्र आजपर्यंत एकदाही अशी रक्कम वा दंड वसुलण्यात आला नाही.
व्हिजिट बुक अनिवार्य असले तरी हे बुक कुणाजवळही नाही.
सुरक्षा रक्षकाजवळची डायरी बेपत्ता
सुरक्षा रक्षकांचे वेतन बँकेतून करणे अनिवार्य, अटीचे उल्लंघन
किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे बंधनकारक. मात्र या अटींचे सतत उल्लंघन केले जात आहे.
अनेक सुरक्षारक्षक ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.