अमरावतीच्या पहिल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:02 IST2017-11-29T00:02:29+5:302017-11-29T00:02:51+5:30
अमरावती पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस कर्मचारी सुशीला मनोहर मोहोड यांचे गत सोमवारी (२० नोव्हे.) निधन झाले.

अमरावतीच्या पहिल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निधन
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अमरावती पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस कर्मचारी सुशीला मनोहर मोहोड यांचे गत सोमवारी (२० नोव्हे.) निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. १९६९ ते २००३ या कालावधीत त्या पोलीस दलात कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळादरम्यान पोलीस दलात अनेक पदे भूषविली.
१० एप्रिल १९५२ साली चांदूर रेल्वे येथे त्यांचा जन्म झाला. सुशीलाचे वडील शिक्षक असल्याने पोलीस दलात सामील होण्यासाठी मार्गदर्शन केले. १९६९ साली पोलीस दलात प्रवेश मिळविला. महिलांसाठी पोलीस दलात प्रशिक्षणाची सोय नसताना त्यांनी पुरुषांसोबत पोलीस प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांची नेमणूक अमरावती येथे झाली. १९७० साली त्यांनी पोलीस प्रशिक्षक मनोहर मोहोड यांच्याशी विवाह केला. त्यांनी गुन्हे शाखेतील पहिली महिला पोलीस शिपाई म्हणून कार्य केले. कर्तव्यावर असताना लोकांची त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असे. १९७८ साली धारणी खून प्रकरणात चंबलची कुख्यात डाकू मुन्नीदेवी हिला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात सुशीला मोहोड यांनी मोठी भूमिका वठविली. २००३ साली त्यांनी सहायक उपनिरीक्षक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक हिंदू स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.